मुक्तपीठ टीम
काही वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना दिलेला भजी तळण्याचा सल्ला चांगलाच गाजला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र, भाजपा समर्थकांनी पुढे सरसावत त्यांच्या सल्ल्याचं समर्थन केलं. आता मात्र भाजपाच्याच माजी नगरसेवकानं पाण्यात भजी तळण्याचं आंदोलन केलं आहे. भाजपाच्या माजी नगरसेवक ज्योती रचोया यांनी पाण्यात भजी तळत महागाईचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
भाजपाने भजी तळण्याचे प्रशिक्षण शिबीर घ्यावे…
ज्योती रचोया यांनी सांगितले की, “नगरसेविका पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे आता त्या मुक्त आहेत. आता त्यांना कामं नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘भजी तळा, रोजगार मिळवा’ या धोरणाने प्रभावित होऊन ते धोरण पुढे नेण्यासाठी, तेथे भजी बनवायला त्या आल्या होत्या.प्रदेश भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सर्व निवृत्त नगरसेवकांसाठी भजी बनवण्याचे शिबिर आयोजित करावं. भजी विकून ते सहज उपजीविका करू शकतील.”
भाजपा माजी नगरसेविकेचे भाजपालाच टोले आणि टोमणे!
ज्योती रचोया यांनी येथे भजी बनवण्यासाठी तेलाऐवजी पाणी आणि छोटा सिलिंडर आणला होता, या सिलिंडरला छिद्र पाडून त्यात एक पाईप सोडून नाल्यात सोडला होता. त्यातून त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नाल्यातून गॅस मिळवण्याच्या विधानाला टोला मानला जातो. महागाईमुळे तेल खरेदी करता येत नाही आहे. यामुळे पाण्यात पकोडे तळतही त्यांनी खाद्यतेल महागाईवर स्वत:च्याच सरकारला टोमणा मारला. तर गॅस सिलिंडर एक हजार रुपयांचा झाला असून सिलिंडरवरील सबसिडीही बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बायोगॅस वापरण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना नाल्यातून बायोगॅस मिळाला नाही. यासाठी त्यांनी सिलिंडरच्या आत लाकूड जाळून पकोडे बनवण्याचीही तयारी केली.
प्रकृती खालावल्याने रुग्णालयात!
- प्रदेश भाजपा कार्यालयासमोर सुमारे दीड तासानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- प्रदेश भाजपाच्या तक्रारीवरून पोलीस पक्ष कार्यालयाबाहेर आले आणि पोलिसांनी सामान हटवले.
- याआधीही अनेकवेळा ज्योती यांनी प्रदेश भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांच्याविरोधात पत्र लिहिली आहेत, असे सांगितले जाते.
- त्यामुळे आंदोलनामागे त्यांचा उद्देश गुप्तांविरोधातील असंतोष उघड करणे हाही असल्याचे मानले जाते.