मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे पुणे येथील अधिवेशन, रिडल्स मोर्चा, रमेश प्रभू निवडणूक जिंकल्यानंतरचा जल्लोष, १९९५ ला निवडणूकीला मतदान करतानाचे छायाचित्र, मुंबई मेरी जान या कार्यक्रमातील छायाचित्र, शिवाजी पार्क येथील सभेतील विविध भावमुद्रा, डॉ. नितू मांडके यांच्या सोबतचे छायाचित्र, गिरगाव सभेतील प्रसिद्ध छायाचित्र, शिवाजी पार्क येथील जाणता राजा या नाटकाच्या दरम्यान काढलेले छायाचित्र, सामना वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा, १९९५ साली मंत्रालयातील छायाचित्र, विविध राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सिनेकलावंत यांच्यासोबतची छायाचित्रे, विक्रांत युध्दनौका भेट, सेना भवन येथे स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात संगणक हाताळतांनाचे छायाचित्र यासह विविध दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान आणि मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने श्रीमान बाळासाहेब ठाकरे: चित्र आणि चरित्र या विषयावर हे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
आज सकाळी ११ वाजता मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, सिद्धेश कदम, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक यांच्यासमवेत अधिसभा सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की वाणी, लेखनी आणि कुंचला यांचा त्रिवेणी संगम असलेले एकमेवाद्वीय नेतृत्व म्हणून बाळासाहेब ठाकरे ओळखले जातात. नव्या पीढीला संस्कार पोहचविण्याचा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. बाळासाहेबांचे अफाट कार्य विविध छायाचित्रकारांनी टिपून छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पीढीला उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार अनिल देसाई यांनी सर्व छायाचित्रकारांचे अभिनंदन केले. नवीन पीढीला या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून संशोधनासाठी खूप वाव असून यानिमित्ताने ज्ञानपीठाचे एक दालन खूले करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी डॉ. निलम गोऱ्हे, यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, बाळासाहेबांचे अभ्यासू व्यक्तिमत्व, इंग्रजी आणि हिंदी भाषेवरील प्रभुत्व हे उल्लेखनिय होते. बाळासाहेबांचे विचार हे फक्त महाराष्ट्रापुरतेच नव्हते. देशप्रेम, देश-विकासाचे विचार आणि त्याचबरोबर अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या विचारांची आणि प्रेरणेची ओळख नव्या पीढीला होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
हे प्रदर्शन १७ ते १९ मे २०२२ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ०७ या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची दूर्मिळ छायाचित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत.