मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेश सरकार आता मुंबईत आपलं खास कार्यालय उघडणार आहे. या कार्यालयाचा उद्देश स्पष्ट कऱणाऱ्या बातम्या उत्तर भारतातील हिंदी दैनिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यात गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच उत्तर प्रदेशातील मुंबईत राहणाऱ्या नागरिकांच्या हिताचे आणि सामाजिक सुरक्षेच्या रक्षणाचा उद्देशही मांडण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हे कार्यालय प्रयत्न करेल. त्याचबरोबर या बातम्यांनुसार, मूळ उत्तरप्रदेशातून मुंबईत आलेल्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वातावरण उपलब्ध करून देणे हाही या कार्यालयाचा उद्देश आहे. याद्वारे मुंबईत नोकरी, व्यवसाय आणि इतर कामे करणाऱ्या उत्तर प्रदेशातील लोकांना सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या हिताचेही रक्षण केले जाणार आहे.
रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील
- यूपी सरकारच्या या कार्यालयामार्फत स्थलांतरित कामगारांसाठी यूपीमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जाईल.
- कोणत्याही आपत्तीच्या वेळी हे कार्यालय उत्तर प्रदेशातील लोकांच्या मदतीचे केंद्र बनेल.
- विशेष म्हणजे या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील सर्व रहिवाशांशी संपर्क साधणे शक्य होणार आहे जे एकतर नोकरी किंवा व्यवसायासाठी मुंबईत दीर्घकाळ वास्तव्य करत आहेत किंवा जे दरवर्षी नोकरीच्या शोधात मुंबईत येतात.
मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना मोठा लाभ मिळणार!!
- लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या लाखो उत्तर भारतीय मजुरांची प्रचंड अडचण झाली होती.
- आता अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास मुंबईतील कार्यालयाच्या माध्यामातून उत्तर प्रदेश सरकार त्या लोकांना मदत करेल.
- योगी सरकारच्या या कार्यालयामुळे मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना त्या राज्य सरकारचे लाभ घेता येणार आहेत.