मुक्तपीठ टीम
चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे, देशातील साडेआठ हजार क्रीडापटूंचे पथक सहभागी होणार आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या स्पर्धांसाठीचे आज पंचकुला येथील इंद्रधनुष प्रेक्षागृहात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ साठीचे बोधचिन्ह, प्रेरकगीत, जर्सी आणि शुभंकर यांचे अनावरण केले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ २% लोकसंख्या असलेल्या हरियाणा राज्यातील खेळाडूंनी अनेक क्रीडास्पर्धांमध्ये देशाला मोठ्या प्रमाणावर पदके मिळवून दिली आहेत. केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री रत्तन लाल कटारिया यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला, हरियाणा विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता, हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग, हरियाणाचे मुख्य सचिव संजीव कौशल आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पारंपरिक खेळांच्या संरक्षणावर भर देत केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की गटका, कलरीपयटू, थंग-ता, मल्लखांब आणि योगासने हे पारंपरिक क्रीडाप्रकार आगामी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ मध्ये समाविष्ट असतील. ते म्हणाले की, युवा क्रीडास्पर्धा आणि नुकत्याच संपलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यांच्यामुळे युवकांना भविष्यात अधिक मोठी उद्दिष्ट्ये साध्य करण्याची प्रेरणा मिळेल. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री म्हणाले की, क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी करून दाखवावी यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
आपले राज्य या क्रीडास्पर्धांसाठी संपूर्णपणे सज्ज आहे असे सांगून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी आपल्या राज्याला खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ चे यजमानपद भूषविण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. हे राज्य केवळ देशासाठी अन्नधान्याचेच उत्पादन करत नाही तर राज्यातील खेळाडू देशासाठी पदके देखील जिंकून आणतात असे ते म्हणाले. आपल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी खेळ उत्तम ठरतात असे ते पुढे म्हणाले.
हरियाणाचा ‘धाकड’ हा शुभंकर!
‘जया नावाचे काळवीट आणि विजय नामक वाघ’ हे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठीचे शुभंकर आहेत तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ साठी हरियाणाचा ‘धाकड’ हा शुभंकर असणार आहे. चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा ४ जून ते १३ जून या कालावधीत हरियाणामध्ये होणार आहेत.
पाहा व्हिडीओ: