मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी औरंगबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र या सभेसाठी काही अटी या पोलिसांकडून घालण्यात आल्या आहेत. मनसेच्या पाडवा मेळाव्यात झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेवरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या सभेला अनेकांकडून विरोध होत होता. मात्र काही अटी शर्तीनुसार या सभेसाठी परवागनी देण्यात आली आहे. दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी पोलिसांनी घातलेल्या अटींचं पालन केलं जाईल, असं स्पष्ट केलं आहे. मात्र, औरंगाबादच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे पुण्यातून ३० एप्रिलला रवाना होणार आहेत.
एक सभा आणि १५ अटी!
- सभा ४.३० ते ९.३० या दरम्यान आयोजित करावी.
- सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, सभेत कुणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी करु नये.
- सभेसाठी १५ हजारहून अधिक लोकांना निमंत्रिक करु नये.
- वंश, जात, धर्म, भाषा, प्रदेशावरून चिथावणी देणारं वक्तव्य करू नये.
- सभेदरम्यान चेंगराचेंगरी वा गोंधळासारखे प्रकार घडल्यास आयोजक जबाबदार असतील.
- सभेमध्ये शस्त्र, तलवारी, स्फोटकं बाळगू नयेत.
- कार्यक्रमाचं ठिकाण किंवा वेळ यामध्ये कोणताही बदल करू नये.
- पोलिसांनी नेमून दिलेल्या मार्गानंच प्रवास करावा.
- सुव्यवस्था राखण्यासाठी मजबूत बॅरिकेट्स उभारावेत
- सभेसाठी आवाजाची मर्यादा ७५ डेसिबल इतकी ठेवावी लागणार
- कार्यक्रमादरम्यान अत्यावश्यक सुविधांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
- सभेच्या दिवसी वाहतुकीसंदर्भातील अधिसूचना सभेला येणारे वक्ते, कार्यकर्ते यांना बंधनकारक असेल
- सर्व अटींची माहिती आयोजकांनी कार्यकर्त्यांना द्यावी.
- सभेसाठीच्या वस्तू, जनरेटरची व्यवस्था आधीच करावी.
- सभेदरम्यान अन्नदान किंवा मिठाई वाटप होणार असेल, तर त्यातून विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.
पोलिसांनी घातलेल्या अटींचं पालन केलं जाईल, पण…
- मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसांनी घातलेल्या अटींचं पालन केलं जाईल, असं स्पष्ट केलं आहे.
- आयुक्तांनी जी परवानगी दिली आहे, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद झाला आहे.
- पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे की त्यांनी घातलेल्या अटींचं नक्कीच पालन केलं जाईल.
- कायदा-सुव्यवस्था राखणं तुमच्याप्रमाणेच आमचं देखील कर्तव्य आहे.
- ते नक्कीच पाळलं जाईल, पण येणाऱ्या लोकांना तुम्ही थांबवू शकत नाही, असंही नांदगावकर म्हणालेत.
- जेवढे लोक येतील, तेवढ्यांना कसं सावरायचं आणि आवरायचं त्याबाबत पोलिसांशी सहकार्याने आम्ही काम करू.
- शुक्रवारी यासंदर्भात पोलिसांसोबत आमची बैठक आहे.
पोलिसांना सतर्क राहाणं गरजेचं…
- पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे.
- आम्ही आमचं काम करणार.
- त्यापलीकडे काही झालं, तर पोलीस त्यांचं काम करण्यासाठी आहेतच.
- आम्हाला कोणतीही अट जाचक वाटत नाही.
- कारण पोलीस जेव्हा केव्हा सभा होतात, त्यासाठी अशाच प्रकारे अटी देतात.
- कदाचित आमच्या सभेसाठी जास्त अटी असतील.
- पोलिसांना सतर्क राहाणं गरजेचं असतं.
- त्या दिवशी प्रचंड कार्यक्रम आहेत.
- त्यामुळे पोलीस काळजी घेत असतील.