मुक्तपीठ टीम
लोकसेवा हक्क अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करुन नागरिकांना तत्पर, पारदर्शीपणे आणि काल मर्यादेत सेवा मिळवून द्याव्यात, अशा सूचना महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी केल्या.
कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
दिलीप शिंदे म्हणाले, लोकांना सेवा मिळवून देणे हे शासकीय विभागाचे प्रथम कर्तव्य व जबाबदारी आहे. शासकीय कामकाजाबाबत नागरिकांचे आणि लोकप्रतिनिधींचे समाधान व्हावे, या पद्धतीने सर्व शासकीय विभागांनी काम करावे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे काम कौतुकास्पद असून त्यांच्याप्रमाणेच सर्व विभाग प्रमुखांनी लोकाभिमुख होवून सेवा द्यावी. कोल्हापूर जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर असून सेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीत देखील अग्रेसर बनण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
दिलीप शिंदे म्हणाले, या अधिनियमांतर्गत येणाऱ्या सर्व सेवा मुदतीत दिल्या जातात, परंतु, या कायद्याच्या कक्षेबाहेर येणाऱ्या सेवादेखील कालमर्यादेत देण्यासाठी प्रयत्न करावेत. या अधिनियमाच्या कक्षेत अधिकाधिक सेवा घेवून त्या ऑनलाईन उपलब्ध करुन देता येतील का याबाबत विचार करण्यात येईल.