मुक्तपीठ टीम
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील राजगढ येथील ३०० वर्षे जुने शिवमंदिर बुलडोझरने पाडले. यानंतर भाजपने काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी याप्रकरणी काँग्रेसला घेरले आहे. करौली आणि जहांगीरपुरी येथे अश्रू ढाळणे आणि हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणे, हीच काँग्रेसची धर्मनिरपेक्षता असल्याचे ते म्हणाले. मंदिर विध्वंसाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्याचवेळी काँग्रेसने प्रत्युत्तर देताना स्थानिक नगर पालिकेत भाजपाची सत्ता असल्याने कारवाईसाठी भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच २०१८मध्ये भाजपाच्या मंडल अध्यक्षांनी पत्र लिहून अतिक्रमण हटवण्याची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजरपा खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांनीही नगरपालिकेतील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं मान्य केलं आहे.
१७ एप्रिल रोजी राजगडचे शिवमंदिर पाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मास्टर प्लॅन अंतर्गत शहरातील गोल सर्कल ते जत्रेच्या चौकाचौकात अडथळा ठरणारी दुकाने व घरे पाडण्यासाठी बुलडोझर चालवण्यात आला. या क्रमाने प्रशासनाचे पथक बुलडोझरसह मंदिरापर्यंत पोहोचले, मंदिराला अतिक्रमण म्हणत त्यांनी मंदिराचा घुमट तोडला. यानंतर कटरच्या सहाय्याने शिवलिंग कापण्यात आले. यादरम्यान हनुमानजीसह इतर देवी-देवतांच्या मूर्तींची मोडतोड करण्यात आली आहे.
भाजपाला मतदान केल्याचा सूड…
- मंदिर पाडण्यात आल्याची तक्रार आम्ही काँग्रेस आमदार जोहरीलाल मीना यांच्याकडे केली होती, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
- तुम्ही भाजपाचे बोर्ड बनवता आणि तक्रार आमच्याकडे करता, असे ते म्हणाले.
- भाजपाला मतदान केल्याचा सूड उगवला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
- यामुळे मंदिरे व घरे पाडण्यात आली आहेत.