मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये शांतता भंग केल्याप्रकरणी एका पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी उपोषण आंदोलन केले आहे. पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला तो त्यांनी महाराष्ट्रात मनसे करत आहे, तसं अजानच्या वेळी हनुमान चालीसा पठण उत्तर प्रदेशात केल्यामुळे! चुकीच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केल्याचे त्यांचा आरोप आहे. अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केले जात होते, मात्र त्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर केला जात नव्हता. पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणी तक्रार आली होती, त्यानंतर पुजाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
जालौनमधील तुलसीनगरचे रहिवासी पुजारी मत्स्येंद्र गोस्वामी यांनी सांगितले की, मंगळवारी स्टेशन मार्गावरील मशिदीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले, परंतु यावेळी लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती न तपासता कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. वातावरण बिघडवण्यासाठी कुणीतरी खोटी तक्रार केली आणि पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे संत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे पुजारी म्हणाले.
मत्स्येंद्र गोस्वामी पुढे म्हणाले की, या घटनेमुळे माझी प्रतिमा डागाळली आहे, त्यामुळे मी गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसलो आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधिकारी शिव कुमार राठोड यांनी सांगितले की, गोस्वामी यांनी १९ एप्रिल रोजी स्टेशन रोडवरील मशिदीसमोर हनुमान चालीसाचे पठण केले होते. तक्रार प्राप्त होताच त्याच्यावर शांतता भंगाच्या कलमाखाली कारवाई करण्यात आली आहे.