मुक्तपीठ टीम
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कौल आता महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना गेलेला दिसत आहे. हा कौलही तसा चांगल्या फरकाने असेल, असं आतापर्यंत आघाडीला मिळालेल्या मताधिक्यामुळे दिसत आहे. ताज्या फेरीअखेर कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या जयश्री जाधवांना ७९ हजारापेक्षा जास्त मते तर भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांनी ६४ हजार मते दिल्याचे स्पष्ट झाले आहे. २१ व्या फेरीअखेर १५ हजारांच्या मताधिक्याने पुढे असणाऱ्या आघाडीचं मताधिक्य वाढतच चाललं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, मतांच्या टक्केवारीच्या हिशेबात आघाडीला ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मते तर भाजपाला ४३ टक्के मते मिळाली आहेत.
पोटनिवडणुकांच्या सामन्यांमध्ये आता २-१
- महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यापासून झालेल्या यापूर्वीच्या दोन पोटनिवडणुकांमध्ये एक आघाडीला तर एक भाजपाला मिळाली होती.
- त्यामुळे लोकप्रियता नेमकी कुणाची त्यावर परस्परांच्या विरोधातील दावे प्रतिदावे होत होते.
- आताची तिसरी पोटनिवडणूक आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जिंकत असल्याने २-१ असा निकाल दिसत आहे.
- तीन पोटनिवडणुकांपैकी दोन आघाडीने तर एक भाजपाने जिंकली आहे.