मुक्तपीठ टीम
आयआयटी म्हणजेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईच्यावतीने एक नवीन आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मास्टर ऑफ आर्टस् बाय रिसर्च (एम.ए. रिसर्च) असा हा अभ्यासक्रम आहे. मानववंश शास्त्र आणि सामाजिक विज्ञान विभागाच्या वतीने चालविण्यात येणा-या या अभ्यासक्रमामध्ये केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर कामाच्या ठिकाणीही महत्वाच्या असलेल्या संशोधन कौशल्यावर भर देण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी माहितीचे विविध स्त्रोत एकत्रित करायला शिकतील, वाचून विचार करायला आणि गांभीर्याने लिहायला शिकतील. तसेच वैचारिक विश्लेषणात्मक आणि पद्धतशीर चौकटीत आपले लेखनकार्य सादर करू शकतील. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातल्या सामान्य अभ्यासक्रमानंतर, विस्तृत, व्यापक अभ्यासक्रमांची निवड करणे शक्य होणार आहे. शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला दृष्टिकोण अधिक सक्षम करण्यासाठी आणि येणा-या प्रश्नांना शिस्तबद्धतेने उत्तर देण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयोगी पडणार आहे. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमासाठी २० जागांना मान्यता देण्यात आली आहे. जुलै- २०२२ मध्ये सुरू होत असलेल्या अभ्यासक्रमामध्ये तीन विस्तृत विशेष विषयांमध्ये शिकवण्यात येणार आहे. यामध्ये अ – मानव विज्ञान, ब- भाषाशास्त्र, साहित्य आणि कामगिरी तसेच क – समाजशास्त्र. या अभ्यासक्रमासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या गेट म्हणजेच जीएटीई-एक्सएच परीक्षेतल्या गुणांनुसार तसेच प्रवेश परीक्षा (एमएएटी) आणि मुलाखत यांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.
या नवीन अभ्यासक्रमाविषयी बोलताना आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिश चौधुरी म्हणाले, ‘‘आयआयटी मुंबई सर्व शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये उत्तम विश्लेषणात्मक कौशल्य विकसित व्हावे, यावर भर देते.
नव्याने प्रस्तावित झालेल्या एम.ए. रिसर्च अभ्यासक्रमाला प्रवेश घेणा-यांमध्ये ‘लर्निंग बाय डुइंग’ ही संकल्पना बळकट होईल. एचएसएस विभागाचे प्रमुख प्रा. कुशल देव म्हणाले, ‘‘ विभागाला विशेषतः आंतरविद्याशाखीय अध्यापनाची क्षमता आणि संशोधनामध्ये विद्यार्थ्यांचा नवीन गट प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल, म्हणून या नवीन अभ्यासक्रमासाठी उत्सुक आहे.’’
अधिक माहितीसाठी कृपया संस्थेच्या शैक्षणिक पृष्ठाच्या लिंकला भेट द्यावी: iitb.ac.in/newacadhome/masterofArts.jsp
या अभ्यासक्रमाविषयीच्या कोणत्याही प्रश्नासाठी – विभाग प्रमुख, एच अँड एसएस, आयआयटी, मुंबई. यांच्याशी संपर्क साधावा.