मुक्तपीठ टीम
एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ३९ कोटी रुपये आज महामंडळाला वितरीत करण्यात आले आहेत. या निधीतून एसटीच्या ३०० बसगाड्यांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विद्यार्थींनींना बारावीपर्यंत शिक्षणासाठी गाव ते शाळेदरम्यान वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते, त्या उद्दीष्टपूर्तीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्व मुलींना गाव ते शाळेपर्यंत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. विद्यार्थींनींना वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्याची ही योजना नियमितपणे राबविण्यासाठी वर्ष २०११ ते २०१३ या कालावधीत प्रत्येक तालुक्याला ५ याप्रमाणे १२५ तालुक्यांना ६२५ बसगाड्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यानंतर टप्प्याटप्याने २४७ अतिरिक्त बसगाड्या खरेदी करण्यात आल्या. सद्यस्थितीत या योजनेंतर्गत महामंडळातर्फे ८७२ बसगाड्या चालवण्यात येतात. महामंडळाला वर्ष २०११ ते २०१३ या कालावधीत टप्प्याटप्प्याने प्राप्त झालेल्या व ॲल्युमिनियम धातूत बांधलेल्या ६२५ बसगाड्यांपैकी ज्यांची ‘बॉडी’ (बांधणी) नादुरुस्त स्थितीत आहेत. अशा ३०० वाहनांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरण करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत प्रतीवाहन १३ लाख रुपये खर्च करुन बसगाड्यांच्या पुन:स्थितीकरणाचे काम करण्यात येणार आहे. राज्य शासनाने ३९ कोटी रुपयांचा निधी वितरीत केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष करुन विद्यार्थींनींचा एसटी प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.