मुक्तपीठ टीम
काश्मीर फाइल्स हा चित्रपट काहींच्या कौतुकाचा तर अनेकांच्या टीकेचा धनी ठरला आहे. मात्र, त्यानंतर आता काश्मीर हा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. काश्मीर फाइल्स गाजल्यानंतर यावेळी २ एप्रिलला काश्मीरींच्या नवरेह म्हणजे नव वर्ष दिनाच्या दिवसाचा सोहळाही जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन सुरु आहे. भाजपा आणि शिवसेनेचे खासदारही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत हेही ऑनलाइन संबोधित करणार आहेत.
जेके पीस फोरमच्या वतीने २ एप्रिल रोजी काश्मीरमधील नवरेह कार्यक्रमाला देशभरातील काश्मिरी पंडितांना एकत्र आणण्याची तयारी करण्यात आली आहे. शारिका मंदिरात पूजेसोबतच शेर-ए काश्मीर पार्कमध्ये नवरेह मिलन कार्यक्रम होणार आहे. खोऱ्यात बंधुभाव वाढवण्यासोबतच पंडितांच्या सन्माननीय परतीचा आवाज बुलंद केला जाईल.
जम्मूहूनही काश्मिरी पंडित बसने खोऱ्यात जातील आणि हरिपर्वतावरील मां शारिका मंदिरात प्रार्थना करून पंडितांच्या परत येण्याची इच्छा व्यक्त करतील. सार्वजनिक कार्यक्रमांच्या परतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यामध्ये सर्व धर्म आणि पंथाच्या लोकांना सहभागी करून घेतले जाईल. भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी आणि शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदीही या नवरेह कार्यक्रमात उपस्थित राहतील.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे नव्या वर्षा म्हणजेच नवरेह निमित्त कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. ३ एप्रिल रोजी संजीवनी शारदा केंद्र जम्मूच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाची व्यथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून समोर आल्यानंतर, यावेळी नवरेला खोऱ्यातील पंडितांच्या पुनरागमनाचा आवाज बुलंद होईल. नवरेह साजरा करण्यासाठी देशभरातील काश्मिरी पंडित २ एप्रिलला खोऱ्यात पोहोचतील.