मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आजपासून सुरु झालेल्या आठवड्यासाठीचा अजेंडा जाहीर केला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारमधील घोटाळेबाजांविरोधातील महत्वाच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे, असं सोमय्या म्हणालेत. त्यांनी न्यायालयातील पाच प्रकरणांच्या सुनावणीची माहिती देतानाच स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या जमीन व्यवहाराच्या चौकशीला सुरुवात करणार असल्याचे सांगितले. या जमीन व्यवहाराविषयी बोलताना सोमय्या यांच्याकडून मोठा संभ्रम करणारी एक छोटीशी भूल झाली. त्यांनी टीव्ही चॅनल्सशी बोलताना भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांचे सासरे आणि मनसेचे नेते दळवी यांचे वडिल सिताराम दळवी यांचे नाव घेतले. त्यामुळे एक प्रकारे किरीट सोमय्या हे भाजपा आणि मनसे नेत्यांच्या नातेवाईकांच्या व्यवहाराचीही चौकशी करणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मात्र, प्रत्यक्षात ट्विटरवर मात्र सोमय्या यांनी शिवसेनेचेच माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे नाव दिले. त्यामुळे संभ्रमाचा वेगळाच खेळ रंगला.
सोमय्यांनी जाहीर केलेला आठवड्याचा आघाडीला हादरवणारा अजेंडा!
- परिवहनमंत्री अनिल परबांविरोधात ३० मार्चला सुनावणी
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफांविरोधात पुणे न्यायालयात सुनावणी
- महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात मुंबई न्यायालयात
- किरीट सोमय्यांच्या याचिकेवर कोरोना घोटाळाप्रकरणी मुंबई न्यायालयात
- खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांविरोधात मुंबई न्यायालयात
- स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांच्या जमीन व्यवहाराची चौकशी
सोमय्यांच्या हिटलिस्टमध्ये यशवंत जाधवांची शिवसेना माजी आमदाराकडूनची जमीन खरेदी!
- किरीट सोमय्या यांनी जाहीर केलेल्या हिटलिस्टमधील सहाव्या क्रमांकावरील नाव यशवंत जाधवांच्या जमीन व्यवहाराचे आहे.
- सोमय्या यांनी यशवंत जाधवांनी दापोलीत केलेल्या कथित ६२ एकर जमीन व्यवहाराची माहिती दिली आहे.
- सोमय्यांच्या आरोपांनुसार यशवंत जाधवांनी शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडून ही जमीन खरेदी केली आहे.
- टीव्हीवरील मुलाखतीमध्ये सोमय्या यांनी सूर्यकांत दळवी यांच्याऐवजी सिताराम दळवी यांचे नाव घेतले होते.
- शिवसेनेचे माजी आमदार सिताराम दळवी हे भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांचे सासरे आहेत.
- तर मनसेचे नेते संदीप दळवी यांचे वडिल आहेत.
- तर शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे दापोली मतदारसंघातील नेते आहेत.
- शिवसेना नेते रामदास कदम यांच्याशी झालेल्या वादामुळे ते मध्यंतरी चर्चेत आले होते.
क्षमस्व!
जाधवांवर जमीन खरेदीचा आरोप करताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडून माजी आमदार सूर्यकांत दळवींऐवजी माजी आमदार सिताराम दळवींचे टीव्हीवर नाव घेतले गेले. ते प्रत्यक्षात बोलत असल्याने बातमीत त्यांच्याच नावाचा, स्वाभाविकच त्यांच्या नातेवाईकांच्या नावांचाही उल्लेख झाला. पण तसे असले तरी मुक्तपीठवर चूक जाणे योग्य नाही. त्याबद्दल क्षमस्व!
- तुळशीदास भोईटे, संपादक, मुक्तपीठ