मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांना मोक्कामध्ये अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्या माध्यमातून कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. आघाडीच्या नेत्यांचा सहभागाचे पुरावे देणाऱ्या स्टिंग ऑपरेशन असलेला पेन ड्राईव्ह सादर करत त्यांनी अधिवेशनात खळबळ माजवली होती. याची चौकशी राज्य पोलिसांऐवजी सीबीआयला सोपवण्यासाठी भाजपा आक्रमक झाली असतानाच राज्याच्या गृहखात्याने मात्र तो तपास राज्य सीआयडीकडे दिला आहे.
भाजपा नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा कट
- भाजपाच्या मोठ्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
- त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या पुण्यातील कार्यालयात कट रचला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता.
- त्यांनी आरोपांच्या समर्थनार्थ पेनड्राइव्हमधून १२५ तासांचे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले होते.
- हे संपूर्ण स्टिंग सभागृहात दाखवले तर इभ्रत जाईल, असंही ते म्हणाले होते.
- त्यांच्या स्टिंग ऑपरेशनच्या आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली होती.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या नार्को टेस्टची मागणी
- फडणवीसांच्या आरोपांमध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या पुण्यातील कार्यालयात कट रचला जात असल्याचा उल्लेख आहे.
- त्यामुळे भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली.
- प्रवीण चव्हाण काय आहे, कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे.
- नगरच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना विचारलं ते याबद्दल सांगू शकतील, असेही विखे-पाटील यांनी म्हटले आहे.
- त्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला.