मुक्तपीठ टीम
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या निकालांनंतर भाजपा जोमात तर काँग्रेस कोमात गेल्याचं सांगितलं जातं. सततच्या पराभवांमुळे काँग्रेससमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं मानलं जात आहे. जी-२३ गटातील काँग्रेसच्या नेत्यांनी थेट पक्षनेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले आहे. या असंतुष्ट नेत्यांशी सध्या काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून चर्चा केली जात आहे. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी शुक्रवारी मोठे विधान केले आहे. काँग्रेस हा सदाबहार पक्ष असून त्याची मुळे लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आहेत, मात्र देशात पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसने आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे ते म्हणाले. त्याचवेळी मोदी युगानंतर भाजपा विस्कळीत होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मोदींनंतर भाजपा विस्कळीत होईल!
- नेतृत्वावरून मोदींनंतरच्या काळात भाजपला आंतरिक कलह सहन करता येणार नाही, असेही मोईली म्हणाले.
- मोदींच्या जाण्याने भाजपा विस्कळीत होणार आहे. भाजपा हा सदाबहार पक्ष नाही.
- असंतुष्ट जी-२३ नेत्यांनी बैठकीदरम्यान निर्णय घेतला की, पक्षासाठी पुढे जाण्याचा एकमेव मार्ग सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व आहे.
- पक्षाला सर्व पातळ्यांवर निर्णय क्षमतेचे मॉडेल पाळावे लागेल.
काँग्रेस आहे भविष्यातही असेल…
- मोईली यांनी सांगितले की, निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने जीवन, समाज या प्रत्येक विषयाकडे स्वतःचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
- जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, काँग्रेस पक्षाने गरीब आणि दलितांसाठी काम करणे थांबवले तर ते संपेल.
- आपण आशा ठेवली पाहिजे.
- काँग्रेस नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी घाबरू नये.
- दलित समाजाच्या हक्कांसाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे.
- भाजपा आणि इतर पक्ष येतील आणि जातील.
- काँग्रेस भविष्यातही असेल.
- सोनिया गांधींना काँग्रेस पक्षात सुधारणा हव्या आहेत पण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी हे होऊ दिलेले नाही.
- ते म्हणाले की, जी-२३ नेते सोनिया गांधींना लक्ष्य करून पक्ष कमकुवत करत आहेत.
- दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.