तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम
आता राजकारणात सारं काही शक्य असतं. अनेकदा आजचे मित्र उद्याचे शत्रू आणि उद्याचे शत्रू आजचे मित्र असतात. आता ते सोडा. कारण आता विषय आहे तो भाजपाचे अतिआक्रमक नेते किरीट सोमय्या यांचा. ते भाजपाविरोधातील राजकारण्यांवर पुराव्यांचे गठ्ठे घेवून तुटून पडत असतात. त्यामुळे सध्या गाजणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांविषयी त्यांची आतून तगमग होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेही भाजपात आणि प्रवीण दरेकरही भाजपातच. त्यामुळे ते सध्या बोलूही शकत नाहीत. नारायण राणेंच्याबाबतीत झालं तसंच! किमान दरेकरांचं प्रकरण ताजं ताजं असल्यानं कल्पनाविलास करायला काय हरकत की ते भाजपात नाहीत…
प्रवीण दरेकर भाजपावासी झालेले नसते तर काय बोलले असते किरीट सोमय्या?
आजची पत्रकार परिषद मी नेहमीप्रमाणे आरोप करण्यासाठीच घेतली आहे. हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नको. पूर्वी मी इतरही काही सामाजिक कार्यांची माहिती घेण्यासाठी पत्रकार परिषद घेत होतो. पण त्याला कोणी विचारायचं नाही. त्यात पुन्हा काहींनी त्याबद्दल पण घोटाळ्यांची कुजबुज सुरु केली. स्वत: काही करत नाहीत, मी केलं तर दुखतं. मी मग तुम्हाला पाहिजे ते घोटाळ्यांचेच फटाके फोडतो. तुम्ही दाखवताच दाखवता. आज मी त्या प्रवीण दरेकरांवर बोलणार आहे.
बाप रे बाप. काय हा माणूस. इंजिनात बसला म्हणजे काय काळं लावून घ्यायचं का कोळशासारखा? अहो याच्याविरोधात आता शेवटी त्यांना एफआयआर घ्यावाच लागला. आला कागदावर ४२०. लागला कलम. हा म्हणे मजूर! याच्याकडे पाहून तुम्हाला वाटते का अशा माणसाने कधी कष्टाची कामे केली असतील. मजुरी केली असेल? पण हा त्या मुंबई बँकेवर मजूर असल्याचं दाखवून निवडून येत होता. त्याच्यावर गुन्हा नोंदवला म्हणून आता ते आघाडीवाले मिरवत आहेत. पण मी सांगतो मुळात यांचाही मोठा घोटाळा आहे. प्रवीण दरेकरने काय पहिल्यांदा निवडणूक लढवली काय? त्यांचा राष्ट्रवादीतील गॉडफादर कोण आहे, ते लोकांना माहित नाही का? एवढी वर्ष कोणामुळे तो मुंबई मुंबई बँकेत सत्ताधारी राहू शकला माहित नाही का?’
उलट या आघाडी सरकारवाल्यांनी या दरेकरांसोबत आता दोन महिन्यांपूर्वी मुंबई बँकेची निवडणूक लढवली. ते संजय राऊतांचे भाऊ, ते राष्ट्रवादीचे लोक सर्व एकत्र लढले. मला सर्व माहित आहे. मी सांगतो, हे सर्व एक आहेत. यांची सर्वांची मिलिभगत आहे. मी तुम्हाला सांगतो, या दरेकरांची सीबीआय चौकशीच लागली पाहिजे. ईडीकडेही मी लवकरच कागदपत्र देणार आहे. असे नाही चालणार. यांना काय वाटते. मी किरीट सोमय्या आहे. सर्व आरोप पुराव्यांसोबतच करतो.
पत्रकार – एक प्रश्न, हे दरेकर तुमच्या पक्षात आले तर…
सोमय्या – आता बघा. मी घोटाळेबाजांबदद्ल बोलतो. आमच्या विवेकानंद गुप्तांनीही या दरेकरांविरोधात किती तक्रारी केल्या माहित आहे का? तेही भाजपावाले मीही भाजपावालाच आहे. त्यांनी जे केले तेच मीही करणार. आम्ही या सर्व भाजपाविरोधातील घोटाळेबाजांविरोधात लढणार म्हणजे लढणार.
आता बसं झालं. मी निघतो.
(भांग न घेता संपूर्ण शुद्धीत धुळवडीनिमित्त दिवसाढवळ्या केलेला कल्पनाविलास…हे १०० टक्के काल्पनिक आहे. कुणाला वाईट वाटलं तर वाटू द्या, हा कल्पनाविलासाचा रंग आज एन्जॉय करा.)
मुक्तपीठ – होळीनिमित्त फूल टू फेक बातमीपत्र – धुळवडीनिमित्त कल्पनाविलास:
- उद्धव ठाकरे फक्त शिवसेना पक्षप्रमुख असते तर… वाचा उद्धव ठाकरेंनी न दिलेली आणि संजय राऊतांनी न घेतलेली रोखठोक मुलाखत…
- देवेंद्र फडणवीस भाजपा-राकाँपा युतीचे मुख्यमंत्री असते तर…मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी विधानसभेत न केलेले स्टिंगचं बिंग फोडणारं भाषण…
- अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते असते तर…अर्थसंकल्पातील अनर्थ मांडत शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, एसटीच्या उपेक्षेवर काय बोलले असते?
- प्रवीण दरेकर हे भाजपाचे नेते नसते, तर किरीट सोमय्या काय बोलले असते? “दरेकरांशी राऊत, पवारांचं संगनमत, पोलीस काय करणार? आता सीबाआय, ईडी मागे लावतो!” बोलले असते?
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क – 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite @Muktpeeth