मुक्तपीठ टीम
रशियन माजी टेनिसपटू मारिया शाकापोव्हा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. गुरुग्राम न्यायालयाच्या आदेशानंतर मारिया शारापोव्हा आणि माजी फॉर्म्युला वन चॅम्पियन रेसर मायकेल शूमाकर आणि अन्य ११ जणांवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीतील एका महिलेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार हे सर्वजण फसवणूक करणारे आहेत.
नवी दिल्लीतील छतरपूर मिनी फार्ममध्ये राहणारी शेफाली अग्रवाल असे या महिलेचे नाव आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिने शारापोव्हा नावाच्या प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट बुक केले होते. या प्रकल्पात शूमाकर नावाचा एक टॉवरही आहे. हा प्रोजेक्ट २०१६ मध्ये पूर्ण व्हायचा होता, परंतु तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तो अद्याप सुरू झालेला नाही.
क्रीडाविश्वातील हे दोन्ही सेलिब्रिटी या प्रोजेक्टशी निगडीत होते आणि ते प्रमोटर होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यात फसवणुकीचाही समावेश आहे. यापूर्वी शेफालीने रियलटेक डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आणखी एक विकासक, शारापोव्हा आणि शूमाकर यांच्या विरोधात ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुरुग्राम न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
तिने कोर्टात सांगितले की तिने आणि तिच्या पतीने गुरुग्रामच्या सेक्टर ७३ मध्ये शारापोव्हाच्या नावावर असलेल्या प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट बुक केले होते. आम्हाला जाहिरांतीद्वारे प्रकल्पाची माहिती मिळाली. प्रकल्पाचे फोटो आणि आकर्षक ऑफर पाहिल्यानंतर आम्ही कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला. पण, ही सर्व खोटी आश्वासने होती, असे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.