मुक्तपीठ टीम
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या पूर्ण मालकीची उपकंपनी एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजने आता भारतीय गुंतवणूकदारांसाठी ग्लोबल गुंतवणूक सोपी बनवली आहे. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजने निवडक अमेरिकन स्टॉक्समध्ये ट्रेडिंगची घोषणा केली आहे. आता गुगल, अॅपल, टेस्ला या नामांकित कंपन्यांसह ८ स्टॉकमध्ये देखील ट्रेडिंग करता येणार आहे. याची सोय एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज प्लॅटफॉर्मद्वारे केली जाईल. ही ऑफर प्रायोजित नसलेल्या डिपॉझिटरी पावत्यांच्या स्वरूपात असेल.
सध्या अमेरिकन कंपन्यांच्या शेअरमध्ये ट्रेडिंग
- एक्सचेंजने एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज पावत्यांची यादी सामायिक केली ज्यासाठी ०३ मार्च २०२२ रोजी ट्रेडिंग सुरू झालं.
- त्यात आठ अमेरिकन स्टॉक्सचा समावेश आहे.
- अल्फाबेट (गुगल), अॅमेझॉन, टेस्ला, मेटा प्लॅटफॉर्म्स (फेसबुक), मायक्रोसॉफ्ट, अॅप्पल, नेटफ्लिक्स आणि वॉलमार्ट असे हे आठ अमेरिकन स्टॉक आहेत.
नॅशनल स्टॉक एक्सेंज समुहाचे अध्यक्ष रवी वाराणसी म्हणाले, “आम्ही टॉपच्या आठ अमेरिकन शेअर्ससह ट्रेडिंग सुरू करत आहोत. बाजार भांडवलानुसार टॉप ५० शेअर्सपर्यंत विस्तार करू. भविष्यात युरोपियन स्टॉकडेही आम्ही वळू शकतो.”
गुंतवणूकदार काय करू शकतात?
- निवडक अमेरिकन स्टॉक्सवरील उर्वरित एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज पावत्यांसाठी, ट्रेडिंग सुरू होण्याची तारीख वेगळ्या परिपत्रकाद्वारे कळविली जाईल.
- अमेरिकन स्टॉकचे संपूर्ण व्यापार, क्लिअरिंग, सेटलमेंट आणि होल्डिंग आयएफएससी प्राधिकरणाच्या नियामक संरचनेच्या अंतर्गत असेल.
- डिमॅट खात्यांमध्ये गुंतवणूकदार डिपॉझिटरी पावत्या ठेवण्यास सक्षम असतील आणि अंतर्निहित स्टॉकशी संबंधित कॉर्पोरेट अॅक्शन फायदे मिळवण्याचा हक्कदार असतील.
- एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजने ऑगस्टमध्ये एका परिपत्रकात म्हटले आहे की, “हा उपक्रम आयएफएससीमधील अशा प्रकारचा पहिला आहे जिथे भारतीय रिझर्व्ह बँकेने विहित केलेल्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम मर्यादेअंतर्गत भारतीय रिटेल गुंतवणूकदार एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर व्यवहार करू शकतात.