मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ५९ जागांवर मतदान होत आहे. दरम्यान लखीमपूर सदर विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बुधवारी सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर सुमारे तासभर एका खोडकर मतदाराने ईव्हीएममध्ये फेविक्विक टाकले, त्यामुळे बटण दाबले जात नसल्याने मतदार नाराज झाले. ही माहिती बीएलओमार्फत अधिकाऱ्यांना मिळताच एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने मतदान यंत्र बदलले आणि सुमारे १५ मिनिटांनी पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार, खोडकर मतदाराने सायकल चिन्हाच्या बटणावर फेविक्विक लावले होते.
लखीमपूर विधानसभा मतदारसंघातील कादीपूर सानी मतदान केंद्रावर हे संपूर्ण प्रकरण समोर आले. येथील जिल्हा अधिकारी महेंद्र बहादूर सिंह यांनी सांगितले की, ही बाब निदर्शनास येताच ईव्हीएममध्ये तात्काळ बदल करण्यात आले असून तेथे पुन्हा मतदान सुरू झाले आहे. तसेच संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
चौथ्या टप्प्यात ५९ जागांवर मतदान
- उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ५९ जागांवर मतदान होत आहे.
- या टप्प्यात २.१३ कोटी मतदार ६२४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
- या टप्प्यातील मतदानासाठी ९१ महिला उमेदवार रिंगणात आहेत.
- या टप्प्यात १६ जागा राखीव आहेत.
- मतदान निष्पक्ष आणि शांततेत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
- या जागांवर २०१७ मध्ये ६२.५५ टक्के मतदान झाले होते.
- या टप्प्यात पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनौ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर येथे मतदान होत आहे.
- एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, केंद्रीय दलाच्या ८६० कंपन्या मतदानासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.