मुक्तपीठ टीम
चंद्रपूर जिल्ह्यातील २४ गावांतील शेतीसाठी गोसीखुर्द जलसिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी मेंढकी आणि अड्याळ उपसा सिंचन योजनेस निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
मंत्रालयात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या विविध जलसिंचन प्रकल्पांच्या प्रश्नांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द प्रकल्पासंदर्भात उद्भवलेल्या समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, ब्रह्मपुरी तालुक्यातील २४ गावातील शेतीसाठी गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळण्याकरिता मेंढकी उपसा सिंचन योजनेस आणि अड्याळ उपसा सिंचन योजनेस निधीसह प्रशासकीय मान्यता मिळणे, गोसीखुर्द प्रकल्पाचा घटक भाग असलेल्या आसोलामेंढा धरणाच्या उंची वाढ कामास त्वरीत मान्यता मिळणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास दीर्घ मुदतीच्या भाडे पट्ट्यावर आसोलामेंढा प्रकल्पातील जमिन पर्यटनासाठी देण्यासंदर्भात, हरणघाट उपसा सिंचन योजनेच्या विविध कामांना मंजूरीबाबत प्रस्ताव तयार करून ते नियामक मंडळास सादर करावे, यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस लघु पाटबंधारेचे उपसचिव अमोल फुंदे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता देवगडे उपस्थित होते.