मुक्तपीठ टीम
देशाता कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळेच अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाने येत्या १४ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून दोन दिवस सुनावणी चालणार असून पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी कमी झाल्यानंतर परिस्थितीचा विचार केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भौतिक सुनावणीचा निर्णय भारताच्या सरन्यायाधीशांनी न्यायाधीशांच्या समितीशी सल्लामसलत करून घेतला आहे.
या आदेशात म्हटले आहे की, राजधानी दिल्लीतील कोरोनाच्या प्रकरणात घट आणि पॉझिटिव्ह दरात घट, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि दिल्ली सरकारने ४ फेब्रुवारी रोजी जारी केलेला आदेश लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर ३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सुनावणी स्थगित करण्यात आली होती आणि व्हर्च्युअल सुनावणी सुरू होत्या.
आठवड्यातून बुधवारी आणि गुरुवारी होणार प्रत्यक्ष सुनावणी
- प्रत्यक्ष सुनावणी आठवड्यातून दोनदा होणार आहे.
- आठवड्यातील बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवशी घेतली जाणार आहे.
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक कमी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सुधारित मानक कार्यप्रणालीचे पालन करीत न्यायालयीन कामकाज सुरु राहणार आहे.
- भारताच्या सरन्यायाधीशांनी या संदर्भात इतर न्यायाधीशांशी सल्लामसलत करून प्रत्यक्ष सुनावणीचा निर्णय घेतला आहे.
- गेल्या वर्षी ठरल्याप्रमाणे आठवड्याच्या इतर दिवशी हायब्रीड पद्धतीने सुनावणी घेतली जाणार आहे.
राज्यात कोरोना मंदावतोय….
- सोमवारी राज्यात ६,४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत तर १८,४२३ रुग्ण बरे झाले आहेत.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.७६% एवढे झाले आहे.
- राज्यात सोमवारी २४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
- राज्यात सोमवारी रोजी एकूण १,०६,०५९ सक्रिय रुग्ण आहेत.