मुक्तपीठ टीम
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारनेही सकाळीच देशभर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. दोन दिवस सोहळ्यांसारखे कार्यक्रमही होणार नाहीत.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: राज्य सरकारची यंत्रणा आणि मुंबई मनपाला लता मंगेशकरांच्या अखेरचा निरोप देण्यासाठी खास सोय करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिवसेनेचे माहिम मतदारसंघातील स्थानिक आमदार सदा सरवणकर हे शिवाजी पार्कमध्ये वेळेत सर्व उभारलं जावं यासाठी देखरेख करत आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही शिवाजी पार्कवरील तयारीचा आढावा घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हेही तेथे बंदोबस्ताच्या व्यवस्थेची तयारी करत आहेत.
- भारतरत्न लता मंगेशकर यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क मैदानात तीन तास ठेवण्यात येणार आहे.
- त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
- भारतरत्न लता मंगेशकर यांना राजकीय सन्मानाने त्यांना मुंबई पोलीस दल आणि भारतीय लष्कराकडून शासकीय इतमामाने सलामी देण्यात येणार आहे.
- त्यामध्ये वीस पोलीस कर्मचारी सामील होतील.
- पोलीस पथकाकडून ३ राऊंड हवेत फायर केले जाणार आहेत.