मुक्तपीठ टीम
कृषि कायद्यांविरोधात देशभरात आज विविध शेतकरी संघटनांकडून महामार्ग रोखले जात होते. शेतकऱ्यांच्या चक्का जामच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपला सिंधुदूर्गचा दौरा पुढे ढकलला आहे. अमित शाह पहिल्यांदाच सिंधुदूर्गामध्ये येणार होते. तसेच नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन समारंभामध्येही ते सहभागी होणार होते. मात्र, आता अमित शाह रविवारी ७ फेब्रुवारी रोजी सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
गृहमंत्री अमित शाह हे नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार होते. लाइफटाइम मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या डीन यांनीही अमित शहा यांची भेट पुढे ढकलल्याची पुष्टी केली आहे. तर या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हेही उपस्थित राहणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला सिंधुदूर्ग आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांत शिवसेनेपेक्षा चांगला विजय मिळवण्यास यश आले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही कोकणातील आपली पकड कमकुवत झाली असल्याचे मान्य केले होते. त्यामुळे कोकणात मिळालेल्या यशाचा मोठा वाटा नारायण राणे यांचा नेतृत्वाचा आहे, असे भाजपाचे म्हणणे आहे.