मुक्तपीठ टीम
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए येत्या १२ दिवसांत मेट्रोच्या दोन कॉरिडॉरच्या मार्गावर ट्रॅक टाकणार आहे. त्यामुळे मेट्रो ७ आणि मेट्रो २ए च्या संपूर्ण कॉरिडॉरवर ट्रायल रन सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कॉरिडॉरच्या ३४ किमी लांबीच्या मार्गावर ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. डीएन नगर मेट्रो स्टेशनजवळ फक्त ५७१ मीटरचा ट्रॅक टाकायचा बाकी आहे. हे कामही ३० जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.
अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) दरम्यान १६.४७३ किमी मार्गावरील मेट्रो ७ कॉरिडॉर आणि दहिसर ते डीएन नगर दरम्यान १८.५ किमी मार्गावरील मेट्रो २ए कॉरिडॉरचे बांधकाम सुरू आहे. २०१९ च्या अखेरीस या मार्गावर सेवा सुरू होणार होती, मात्र अजूनही या मार्गावरील कॉरिडॉरचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. ३४ किमी लांबीच्या कॉरिडॉरच्या मार्गावर ३१ मे २०२१ पासून २० किमीच्या मार्गावर ट्रायल रन सुरू झाली आहे.
वेळेत काम पूर्ण केले नसल्याने कंत्राटदारांना लाखोंचा दंड
- मेट्रो प्रकल्पामुळे महानगराची वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे.
- अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असतानाही कंत्राटदारांनी वेळेत काम पूर्ण न केल्याने अजूनही मेट्रो सेवा सुरू झालेली नाही.
- एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वेळेवर काम पूर्ण न करणाऱ्या चार कंत्राटदारांना लाखो रुपयांच्या दंडासह कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
२०२२ च्या अखेरीस मेट्रो धावणार
- मेट्रो ७ आणि मेट्रो २ए कॉरिडॉरच्या २० किलोमीटरच्या मार्गावरील चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे.
- या मार्गाच्या अंतिम तपासणीसाठी मेट्रो रेल्वे सेफ्टी म्हणजेच सीएमआरएस आयुक्तांचे पथक येत्या १० ते १५ दिवसांत मुंबईत येऊ शकते.
- यादरम्यान ही टीम मेट्रोच्या रोलिंग स्टॉकची तपासणी करेल.
- त्याअंतर्गत मेट्रो ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि मेट्रोमध्ये बसवण्यात आलेली सर्व उपकरणे तपासली जाणार आहेत.
- रोलिंग स्टॉकची चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर स्थानक परिसर आणि प्रवाशांच्या सोयीची तपासणी केली जाईल.
- फेब्रुवारी किंवा मार्चच्या अखेरीस ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- २०२२ च्या अखेरीस दोन्ही मेट्रो कॉरिडॉरच्या संपूर्ण मार्गावर ही सेवा सुरू होईल.
पाहा व्हिडीओ: