मुक्तपीठ टीम
मुंबई राष्ट्र सेवा दल आयोजित चला अनुभवूया “रंगांची शाळा – शाळेला रंग” या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. कोकणात पूर आला तेव्हा कोकणवासियांच्या मदतीला राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते धावून गेले होते. त्यावेळी मुंबई राष्ट्र सेवा दलाने महाड नगरपरिषदेच्या दोन पूरग्रस्त शाळांना वाचनालयासाठी कपाटे आणि संगणक प्रदान केले होते. त्याचवेळी या शाळांचा कायापालट करण्याचे आश्वासन राष्ट्र सेवा दल मुंबईने या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले होते. त्यानुसार विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कार्यकर्ते या सर्वांनी मिळून शाळेचे रुप बदलायचे ठरवले. त्यानुसार साने गुरूजींना कृतिशील अभिवादन करत महाडमधे साने गुरुजी जयंती निमित रंगांची शाळा भरवण्यात आली!
“चला अनुभवुया रंगांची शाळा – शाळेला रंग” या उपक्रमासाठी सकाळपासून शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाडमधील NSS आणि NCC चे विद्यार्थी, प्राध्यापक, राष्ट्र सेवा दल मुंबई आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर येथील कार्यकर्ते यांची लगबग सुरू होती. शाळेचे पटांगण गजबजले होते. आणि कम्युनिटी पेंटीगच्या माध्यमातून जागतिक किर्तीचे प्रसिध्द चित्रकार राजू सुतार या सर्वांना सोबत घेऊन शाळेचा कायापालट करायला सज्ज झाले होते.
मैदानावर शाळेतील लहान लहान मुलामुलींना एकत्र करुन कार्यकर्ते गाणी घेत होते आणि तिकडे त्या तालावर चित्रकार राजू सुतार आपल्या कुंचल्यातून रिकाम्या भिंतीवर सर सर काहीतरी चितारत होते. काळ्या रंगाच्या आऊटलाईनचे आकार पाहून आता काय रंगवायचे असा प्रश्न पडलेल्या सर्वांच्या हातात ब्रश आणि रंगांचा रोलर आला आणि सुरू झाली सगळ्यांची रंगांबरोबरची धम्माल!!
हवा तो रंग मनसोक्त वापरण्याची मुभा असल्याने प्रत्येकाने या रंगांच्या शाळेत मनापासून रंग भरले आणि काही तासातच साकारली रंगीबेरंगी शाळा!! पूरग्रस्त महाडवासीय मुलांसाठी ही रंगीत शाळा आनंददायी ठरणार आहे. विविध रंगाची सरमिसळ असलेली ही शाळा या मुलांच्या मनातील पूराची मरगळ स्वच्छ धुवून काढून रंगीबेरंगी स्वप्नांच्या दुनियेत या मुलांना घेऊन जाणार आहे. महाडच्या शिक्षण सभापती सपनाताई बुटाला यांनी तर आता सगळे महाडकर या नगरपरिषदेच्या शाळेला यापुढे रंगांची शाळा म्हणूनच ओळखतील असे हर्षभराने सांगितले.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार राजू सुतार यांच्या कल्पक संयोजनात सकाळी हे आकर्षक रंगकाम सुरू झाले तेव्हा साधारण १७० जण या रंगांच्या शाळेत हजर होते. राष्ट्र सेवा दल, मुंबई आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, माणगाव यांच्या कार्यकर्त्यांसोबत महाडमधील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे NCC आणि NSS चे विद्यार्थी महाडमधील या नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर या रंगांच्या शाळेत सहभागी झाले. शाळेतील शिक्षक, पालक आणि महाडमधील नागरिकही या रंगांच्या शाळेत उत्साहाने सहभागी झाले. शाळेच्या बाहेर रिक्षाच्या रांगेत उभे असलेेले रिक्षावालेही शाळेत येऊन रंगांचा हात मारुन गेले.
राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने महाड येथील नगरपरिषदेच्या शाळेत साकारलेल्या रंगाच्या शाळेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार राजू सुतार, चित्रकार वैशाली ओक, संदीप गुरव, नवीन परमार, हितेश उतेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाडचे NSS आणि NCC चे विद्यार्थी, महाविद्यालय प्रा.विक्रांत बागडे, प्रा.संजय वाबळे, प्रा.विश्वास पाटील, कॅप्टन एन आर चव्हाण, प्रा. बटावले, प्रा.शिंदे, महाड नगर परिषद शाळा क्रमांक 1चे मुख्याध्यापक भरत जाधव, शिक्षक दिनकर बहिरम, स्नेहल माळवदे, दीपाली हाटे, शाळा नंबर 2 च्या मुख्याध्यापिका मिनिता हाटे, स्नेहल टिपणीस, सुप्रिया मोरे, स्नेहा चिखले, राष्ट्र सेवा दल आणि सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकर्ते संजय मं.गो., सिरत सातपुते, शरद कदम, महादेव पाटील, लतिका सु.मो., मिलिंद टिपणीस, सुधीर शेठ, शैलेश पालकर, सावित्री मुंढे, मेनका मुंढे, किशोरी लाड, गीतांजली पाटील, मारुती पवार, प्रशिक गायकवाड, बाबाजी धोत्रे, शाळेतील विद्यार्थी, पालक, स्थानिक रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे उपप्राचार्य दिपक क्षीरसागर व संदीप गुरव यांनी विशेष मेहनत घेतली.
पूरग्रस्त महाडमधील नगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले महाड नगरपरिषद कन्या शाळा क्र. २ आणि महाड नगरपरिषद शाळा क्र.१ या शाळेत भरलेल्या रंगाच्या शाळेत रंगलेल्या या चिमुरड्यांच्या जीवनात रंग भरण्याचे काम जागतिक किर्तीचे चित्रकार राजू सुतार यांनी केलय. महाड शहराच्या लँडस्केपवर ही रंगांची शाळा उठून दिसतेय. पूरग्रस्त महाडकर ही रंगांची शाळा बघायला येतील. ही रंगांची शाळा महाडकरांसाठी नवोन्मेषाचे रंग घेऊन येईल आणि नव्या उमेदीने महाडकर नव्या वर्षात प्रवेश करतील. राष्ट्र सेवा दल आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक या वाटचालीत महाडकरांच्या सदैव सोबत असेल ह्या आश्वासनावर या कार्यक्रमाची सांगता झाली.
पाहा व्हिडीओ: