मुक्तपीठ टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं संकट संपताना संपत नाही, असं दिसत आहे. ईडीने मुंबईतील पीएमएलए न्यायालयात त्यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या ७ हजार पानांच्या पुरवणी आरोपपत्रात देशमुख यांचे मुख्य संशयित आरोपी म्हणून निश्चित केले आहे. तसेच त्यांच्यासह मुलांवरही ५० कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे.
ईडीच्या आरोपपत्रात कोणते मुद्दे?
ईडीने बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयात अनिल देशमुखांविरुद्ध सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
या आरोपपत्रात अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ५० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हे पैसे त्यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये बेकायदेशीरपणे गुंतवल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिल देशमुख यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील यांच्यासह सीए भाविक पंजवानी यांचीही नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली आहेत.
अनिल देशमुख प्रकरणात सरकारी अधिकारी साक्षीदार
- या आरोपपत्रात महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
- संशयास्पद व्यवहारासंदर्भात ईडीला ऋषिकेश आणि सलील यांचे जबाब नोंदवायचे आहेत.
- अंमलबजावणी संचालनालयाला त्यांच्या तपासादरम्यान देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये अनेक संशयास्पद व्यवहार केल्याचे आढळून आल्याचा उल्लेख केला आहे.
- मात्र, चौकशीदरम्यान देशमुखांचे सीए भाविक पंजवानी आणि इतरांकडून ईडीला समाधानकारक उत्तरे मिळू शकलेली नाहीत.
देशमुख प्रकरणी दुसरे आरोपपत्र
- अनिल देशमुख प्रकरणी बुधवारी ईडीने दाखल केलेले हे दुसरे आरोपपत्र आहे.
- ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, ईडीने अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या संदर्भात पहिले आरोपपत्र दाखल केले होते.
- सचिन वाझेला मुंबईतील डान्सबारकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देऊन आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा देशमुख यांच्यावर आरोप आहे.