मुक्तपीठ टीम
नाशिकमध्ये द्राक्षांच्या दराबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी राष्ट्रीय शेतकरी दिनी शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं आहे. द्रात्र उत्पादक नाशिककर शेतकऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे, हे विशेष! आता नाशिकमध्ये ठरवलेल्या दरानंच शेतकरी द्राक्ष विकणार आहेत. द्राक्षाचे दर हे द्राक्ष बागायतदार संघाने ठरवले आहेत. म्हणजेच उत्पादन खर्चावर आधारित किमान १० टक्के नफा पकडून हे दर ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार जानेवारी महिन्यात प्रतिकिलो ८२ रुपये, फेब्रुवारी महिन्यात ७१ तर मार्चमध्ये ६२ रुपये हा कमीत कमी दर करण्यात आला आहे.
सरकारला जमलं नाही, ते शेतकऱ्यांनी करुन दाखवलं!
- गेल्या काही दिवसांमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान आणि सरकारची बदलती भूमिका यामुळे सर्वच द्राक्ष उत्पादित शेतकऱ्यांना याचा फटका बसत होता.
- गेल्या १५ दिवसांपासून दर निश्चितीची प्रक्रिया ही सुरु होती.
- अनेक बैठका पार पडल्यानंतर महिन्याच्या फरकाने दर कसे राहतील यावर एकमत झाले आहे.
- एवढेच नाही तर कुणीही ठरलेल्या दरापेक्षा कमीने विक्री करायची नाही असा ठरावच घेण्यात आला आहे.
- बागायदार संघटनांनी हा ठराव मांडताच शेतकऱ्यांनी याला सहमती दर्शवली व ठराव मंजूर होताच एकट जल्लोष करण्यात आला.
राष्ट्रीय शेतकरी दिवशी शेतकऱ्यांचे
- राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ६१ वर्धापन दिन व राष्ट्रीय शेतकरी दिवसाचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे.
- पिंपळगाव बसवंतमधील सभागृहात हा निर्णय घेण्यात आला आहे.
- शासनाच्या दुर्लक्षामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- निर्यात द्राक्षावर लावण्यात येणारी जीएसटी तसेच विविध कर कमी करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती.
- मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते.
- शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
- या सर्व बाबींचा सरकारला विसरच पडत होता.
- त्यामुळे नुकसान होऊनही कमी दराने द्राक्ष विक्रीची नामुष्की होती.
- त्यामुळे बागायतदार संघाने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी होणार आहे.