मुक्तपीठ टीम
अमेरिकेत ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत आहे आणि आता हा नवीन प्रकार ७३ टक्के संक्रमितांमध्ये आढळून आला आहे. याला सामोरे जाण्यासाठी जो बायडेन यांनी कृती आराखडाही जारी केला आहे. ओमायक्रॉनला सामोरे जाण्यासाठी, ५० कोटी जलद चाचणी किट खरेदी करण्याचा आणि रुग्णालयात सुविधा वाढवण्याचा आणि लसीकरणाचा वेग दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, अमेरिका एफडीएने १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी फायझरची कोरोना अँटीव्हायरल गोळी मंजूर केली आहे.ही गोळी ओमायक्रोनवरही प्रभावी आहे.
अमेरिका फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने बुधवारी फायझरच्या पॅक्सलोव्हिड टॅब्लेटला १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या उच्च जोखमीच्या लोकांसाठी कोरोनावर उपचार करण्यासाठी मंजूरी दिली. असे सांगितले जात आहे की ही गोळी कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन प्रकारापासून संरक्षण करण्यासाठी देखील प्रभावी आहे. सेंटर फॉर ड्रग इव्हॅल्युएशन अँड रिसर्चच्या संचालक पॅट्रिझिया कावाझोनी यांनी सांगितले की, ही गोळी या जागतिक महामारीविरुद्धच्या लढ्यात एक मोठे पाऊल ठरेल.
त्याच वेळी, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) ने सांगितले की गेल्या आठवड्यातील डेटा दर्शवितो की ओमायक्रॉन सहा पट वेगाने वाढत आहे. हे संपूर्ण अमेरिकेमध्ये पसरले आहे. न्यूयॉर्कमध्ये हा प्रकार ९० टक्के संक्रमितांमध्ये आढळून आला आहे. राष्ट्रीय आकडेवारीवरून असे दिसून येते की, अमेरिकेत साडेसहा लाखांहून अधिक लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन प्रकाराचे बहुतेक रुग्ण सामान्य उपचाराने बरे होत आहेत. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की त्यांच्या देशातील बहुतेक ओमायक्रॉन रुग्णांना कोणत्याही विशेष उपचारांची आवश्यकता नसते. साध्या उपचाराने बहुतांश रुग्ण बरे झाले आहेत. डॉ. कोएत्झी यांनी कोरोनाचा हा नवीन प्रकार ओळखला, त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याचे नाव ओमायक्रॉन ठेवले.