मुक्तपीठ टीम
कर्नाटकच्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महारांज्याच्या पुतळ्यावर काळा रंग ओतल्याचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अधम कुकृत्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच सर्वत्र कर्नाटक सरकारचा निषेध केला जात आहे. बेळगावसह कोल्हापुरात रात्रीपासूनच निषेध नोंदवण्यात येत आहे. कोल्हापुरातील शिवप्रेमींनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे.
शिवप्रेमी रस्त्यावर उतरले!
- बंगळुरूतील घटनेच्या निषेधासाठी बेळगाव शहरात गुरुवारी धर्मवीर संभाजीराजे चौकात शेकडो मराठी शिवप्रेमी जमले होते.
बेळगावात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. - पोलिसांनी शहरात १४४ कलम लागू केलं आहे.
- रविवार सकाळी सहा वाजेपर्यंत कलम १४४लागू असणार आहे.
- रस्त्यावर उतरून घोषणा देणाऱ्या शिवप्रेमींना कर्नाटक पोलिसांनी अटक केली.
- त्यांना बेळगाव न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.
- आंदोलकांच्या वतीने अॅड. महेश बिर्जे आणि शंकर पाटील यांनी बाजू मांडली.
अटकेच्या निषेधार्थ महिलांचे आंदोलन
- बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपींवर कारवाई झालेली नाही, मात्र निषेध करणाऱ्या शिवप्रेमींना कर्नाटक पोलीस तुरुंगात डांबत आहेत.
- त्यामुळे बेळगाव आणि सीमाभागात संताप व्यक्त होत आहे.
- बेळगावातील शिवाजी उद्यानात निषेध मोर्चा काढण्यासाठी जमलेल्या लोकांना पोलिसांनी रोखले.
- पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली, तेथेच महिलांनी ठिय्या आंदोलन केले.
- अटक केलेल्या तरुणांना सोडण्याची मागणी करण्यात आली.
कोल्हापूरात घटनेचे पडसाद
- महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरली.
- त्यांनी कर्नाटकचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
- युवा सेनेचे हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरीतील कन्नड व्यावसायिकांची हॉटेल बंद केली.
- त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे.
- त्यानंतर बेळगावमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- त्यामुळे बेळगावला सध्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
संजय राऊत
दोन दिवस आधी पंत प्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते..
हे चित्र बेंगळुरू येथील आहे..
धिक्कार!धिक्कार!
उठ मराठ्या ऊठ!!
एकनाथ शिंदे
कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे.
कर्नाटक सरकारने बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं.
मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही.
अमोल मिटकरी
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ही विकृती असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर याबाबत सरकारने हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारशी बोलणी करावी असेही ते म्हणाले आहेत.