मुक्तपीठ टीम
“आपल्या प्रत्येकात एक कवीमन दडलेले असते. भावना, निरीक्षणे, कल्पना यांना शब्दांमध्ये गुंफून हृदयाला हात घालण्याची क्षमता कवितेमध्ये असते. चेहऱ्यावर हास्य फुलवणारी आणि डोळ्यात चटकन पाणी आणणारी कविता असते. समाजातील वेदनांची मांडणी करत अन्यायाला वाचा फोडणारी आणि दिलखुलास कौतुक करत प्रेरणा देणारीही कविता असते. अशा सगळ्याच हृदयस्पर्शी भावभावनांचे दर्शन ‘उन्मुक्त’मधून घडते,” असे मत प्रसिद्ध उद्योजक डॉ. जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
कवी विद्याधर फडणवीस लिखित मीनल प्रकाशन प्रकाशित ‘उन्मुक्त’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ लेखिका, कवयित्री शुभांगी भडभडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उद्योजक राजपाल आर्या, मीनल प्रकाशनाच्या सौ. राजहंस आदी उपस्थित होते. मोठ्या उद्योग समूहातून उच्च पदावरून निवृत्त झाल्यानंतर फडणवीस यांनी लिहिलेल्या या कविता खूपच सकस आणि प्रतिथयश कवितांसारख्या आहेत, असेही डॉ. जोशी यांनी नमूद केले.
शुभांगी भडभडे म्हणाल्या, “कविता साहित्याला समृद्ध करणारी असते. फडणवीस यांनी अत्यंत सहजपणे सर्व विषयांना स्पर्श ‘उन्मुक्त’मध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात प्रेमभाव, नातेसंबंध, आईची माया, आयुष्याची वाटचाल, समाजातील विविध घटकांचे पडसाद आणि प्रतिबिंब असे सर्वच या कवितांमध्ये आहे. या कविता वाचताना आपलेपणाची भावना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.”
विद्याधर फडणवीस म्हणाले, “नोकरीत असताना अनेकदा लिहावेसे वाटे. पण पुरेसा वेळ मिळायचा नाही. निवृत्तीनंतर मात्र कविता लिहिण्यावर लक्ष्य केंद्रित केले. आजवरच्या जगण्यातील अनुभव, निरीक्षणे यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लिखाणाचा हा छंद आणखी समृद्ध करायचा आहे.”