मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन आता भाजपसाठी भलतेच अडचणीचे झाले आहे. आतापर्यंत हे आंदोलन फक्त पंजाबमधील असे हिनवल्यानंतर आधी हरियाणा आणि आता उत्तरप्रदेशच्या पश्चिम भागातही शेतकरी आंदोलन पेटू लागले आहे. उलट आंदोलनाचा केंद्रबिंदू आता जाट शेतकऱ्यांचा तोच भाग बनत चालला आहे. राष्ट्रीय लोकदल आणि अन्य भाजपाविरोधी पक्षांचा हा बालेकिल्ला भाजपने प्रयत्नपूर्वक ओढून घेतला होता, आता मात्र त्या जाटलँडमध्ये भाजपाविरोधात संताप वाढताना दिसत आहे.
पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी आंदोलन तीव्र झाल्यानंतर आता पश्चिम उत्तर प्रदेश हा शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनत चालाला आहे. असे झाल्यास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ते अडचणीचे जाऊ शकते. मुझफ्फरनगर येथील शेतकरी महापंचायत बोलविण्यात आली होती. त्यात बीकेयू नेते नरेश टिकैत यांनी भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “भाजपावर विश्वास ठेवणे ही सर्वात मोठी चूक होती आणि ही चूक आम्ही पुन्हा करणार नाही”.
भाजपासाठी रेड अलर्ट
नरेश टिकैत यांचे हे उद्गार भाजपसाठी रेड अलर्ट आहेत. राष्ट्रीय लोकदल नेते अजितसिंग यांना पराभूत करणे ही त्यांची सर्वात मोठी चूक होती, असेही टिकैत पुढे म्हणाले आहेत. त्यांना तसे वाटणे हे भाजपासाठी धोक्याचे आहे. त्यातून किसान युनियन आणि अजितसिंग यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपासमोर नवी आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे
उत्तर प्रदेशच्या राजकारणात जाट फॅक्टर
- उत्तरप्रदेशातील १७ टक्के लोकसंख्या जाट समाजाची आहे
- उत्तर प्रदेश विधानसभेच्या १२० जागांवर जाट मतदारांचा प्रभाव आहे
- एकेकाळी याठिकाणी चौधरी चरण सिंह आणि शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत याचा प्रभाव होता.
- या दोघांच्या चलतीच्या काळात त्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्य नव्हते, अशी परिस्थिती होती
- चौधरी चरणसिंह आणि महेंद्रसिंग टिकैत यांच्या पुढच्या पिढीला मात्र तसा राजकीय प्रभाव टिकवता आला नाही
- सध्यातरी चौधरी अजित, जयंत सिंह, नरेश टिकैत, राकेश टिकैत यांची राजकीय पकड नाही
- मात्र, आता जाट अस्मिता दुखावली गेली तर पुन्हा टिकैत-चौधरी समीकरण जमून भाजपाला धक्का बसू शकतो
टिकैतांच्या अश्रूंनी पेटवल्या भावना
शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारामुळे शांत होणारे आंदोलन पुन्हा तीव्र झाले आहे. भाजप नेत्यांच्या संपर्कातील दीप सिद्धूवर चिथावणीखोरीचा आरोप होताच भाजपकडून राकेश टिकैत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात झाली. त्यातून दुखावलेल्या गेलेल्या राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पश्चिम उत्तर प्रदेश शेतकरी आंदोलनाचे नवे केंद्र ठरू लागले आहे. त्याचवेळी मुझफ्फरनगरच्या किसान महापंचायतीतील राष्ट्रीय लोकदलाचे उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी नरेश टिकैत यांच्यासोबत मंचावर एकत्र येत मागील चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. चौधरी आणि टिकैत एकत्र आले तर जाट समाजाची एकसंध मुठ उगारली जाईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिघडलेली समीकरणे आता जोडली गेली तर ही एकता भाजपासाठी अडचणीची ठरू शकते.