मुक्तपीठ टीम
गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटने ग्यारापट्टी जंगलात झालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून चकमकीत नगरचा मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली. या चकमकीत तीन जवानही जखमी झाले आहेत. गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी याला दुजोरा दिला आहे.
आजवरची सर्वात मोठी कारवाई
- एसपी अंकित गोयल म्हणाले, “आम्ही आतापर्यंत २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह जंगलातून बाहेर काढले आहेत.
- ” ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये त्यांच्या टॉप कमांडरचाही समावेश आहे.
- मिलिंद तेलतुंबडे माओवादी संघटनेच्या केंद्रीय सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य होता.
- महाराष्ट्र, छत्तीसगढ, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओदिशा इत्यादी ६ राज्यात तो सक्रिय नक्षलवादी होता.
- त्याच्यावर तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस होते.
- ग्यारापट्टीच्या जंगल परिसरात असलेल्या धानोरा येथे पोलिसांचे पथक शोध मोहीम राबवत असताना ही चकमक झाली.
- कमांडोना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
- सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ते जंगलाच्या दिशेने पळून गेले.
- मार्डिनटोला गावाजवळ सकाळी चकमक सुरू झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
- तीन जखमी पोलिसांना उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आले.
- त्यांनी सांगितले की, छत्तीसगडच्या जंगलातून काही नक्षलवादी गडचिरोलीला जात असल्याची माहिती पोलिसांच्या कमांडो टीमला मिळाली होती.
कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?
- माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेची देशभरातील नक्षलवादी कारवायांमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे.
- मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास या नावाने ओळख असलेला हा माओवादी नेता गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत ठार झाला आहे.
- समाजाच्या काही घटकांमध्ये हिंसक विचारसरणी पेरुन नक्षल भरती करण्यात त्याचा मोठा हात होता.
- पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेचा मृत्यू झाल्याने नक्षलवाद्यांसाठी हा मोठा झटका असणार आहे.
- मिलिंद तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता उर्फ कविता ही बीएस्सी (मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी (झुऑलॉजी), एम्ए (सोशॉलॉजी) आणि बीएड अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती.
- तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात.
- तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.