मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा पहिलाच राष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री ललिता आणि ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांना जाहीर करण्यात आला आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बंधुता प्रकाशनच्या संचालिका मंदाकिनी रोकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील १५ महिलांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सहयोगाने येत्या २७ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्रकार भवनमध्ये होणाऱ्या सोहळ्यात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते सबनीस दाम्पत्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. या सोहळ्याला डॉ. विजय ताम्हाणे, कवी चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित राहणार आहेत.
मंदाकिनी रोकडे यांच्यासह वैशाली मोहिते (पुणे), मधुराणी बनसोड (वाशीम), शिल्पा परुळेकर (वसई), अक्षदा देशपांडे (मुंबई), दीपिका सुतार (सिंधुदुर्ग), चंदना सोमाणी (पुणे), माधुरी चौधरी (औरंगाबाद), शरयू पवार (पुणे), जयश्री पाटकर (अमरावती), सरिता पवार (सिंधुदुर्ग), डॉ. नीलम जेजुरकर (राजगुरूनगर), डॉ. सुनीता खेडकर (पुणे), पौर्णिमा खांबेटे (पुणे), मनीषा शिंदे पाटील (पलूस, सांगली) यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.
डाॅ. सबनीस यांनी ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, २० व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि इतरही महत्वपूर्ण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. ललिता सबनीस यांच्या मनस्पंदन, रमाबाई, सुखाच्या शोधात या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. डाॅ. सबनीस यांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून सातत्याने परखडपणे व्यक्त केलेल्या सत्यशोधकी आणि पुरोगामी विचारांचा हा सन्मान आहे, असे रोकडे यांनी सांगितले.