मुक्तपीठ टीम
एक फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना मुंबईच्या लोकलमधून प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लोकलमधून प्रवासासाठी काही विशिष्ट कालावधी ठरवण्यात आले आहेत.
गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली आणि त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली मुंबईतील लोकल रेल्वे सेवा आता सर्वसामांन्यांसाठी खुली करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून लोकल सेवेअभावी प्रवास हाल सोसणाऱ्या सर्वसामान्यांना रेल्वेतून प्रवास करता येणार आहे. गर्दी होऊ नये, यासाठी विशिष्ट वेळा निर्धारित करण्यात आल्या आहेत:
सर्वसामान्यांना यावेळेत करता येणार प्रवास
सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे.
सर्वसामान्यांना प्रवास कधी करता येणार नाही
सर्वसामान्यांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
उपहारगृहे व दुकानांसाठी निर्धारित वेळा
मुंबई व मुंबई उपनगर क्षेत्रातील दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील.