मुक्तपीठ टीम
२६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर तीन दिवसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे पोलीस सिंघू आणि गाझीपूर सीमेवर कार्यरत राहिले आहेत. दोन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. गुरुवारी गाझीपूर सीमा बंद करण्यात आली होती. तेथे वीज-पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला होता. उत्तरप्रदेश सरकारच्या सर्वत्र आंदोलन थांबवण्याच्या आदेशानंतर, गाझियाबाद प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना गाझीपूर सीमा रिकामी करण्यास सांगितले. यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कठोर कारवाईच्या भीतीने भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आंदोलन हे सुरूच राहील. कृषी कायदा मागे घ्या, अन्यथा ते आत्महत्या करतील. या टिकैत यांच्या समर्थनार्थ हरियाणाहून हजारो ट्रॅक्टर व गाड्या रात्री दिल्ली सीमेवर रवाना झाल्या.” टिकैट यांच्या मुझफ्फरनगर येथील सिसौली गावात आज एक महापंचायत बोलावण्यात आली आहे.
गेल्या २४ तासातील टॉप १० घडामोडी-
१.गाझिपूरमध्ये पोलीस तैनात झाल्यानंतर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सरकारने लाठीमार करून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला. आज गाझीपूर आणि सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. शेतकर्यांना तोडणारे गद्दार हे देशद्रोही आहेत. दरम्यान, नोएडामध्ये कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आणि अनेक पत्रकारांविरोधात आंदोलनाच्या अफवा पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. शेतकरी आंदोलनापासून आणखी दोन संघटनांनी माघार घेतली आहे. यात भारतीय किसान युनियन (लोकशक्ती) आणि भारतीय किसान युनियन (एकता) यांचा समावेश आहे. कृषीमंत्र्यांशी भेट घेतल्यानंतर दोन्ही संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राष्ट्रीय कामगार शेतकरी संघटना आणि भारतीय किसान युनियन (भानू) यांनी या आंदोलनातून माघार घेतली होती.
३. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधील राकेश टिकैट यांच्या सिसौली गावात शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे. भाकियूचे प्रमुख नरेश टिकैत यांनी तेथे पंचायत बोलावली. शुक्रवारीही येथे महापंचायत बोलावण्यात आली आहे. मात्र, नरेश टिकैत यांनी गुरुवारी दुपारी हे आंदोलन संपवण्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की पोलिसांनी शेतकर्यांना मारहाण केली.
४. गाझीपूर सीमेवर राकेश टिकैत यांच्या मंचावर एकच खळबळ उडाली. एक माणूस जबरदस्तीने स्टेजवर चढला. यानंतर राकेश टिकैत म्हणाले की, हा माणूस काठी घेवून स्टेजवर चढला होता. या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
५. आंदोलकांचा उत्साह कायम राहण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने सिंघूवर मोर्चा काढला. मोर्चाच्या वेळी हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी आपापसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या रॅलीत शेतकरी नेते गुरनाम चाधुनी, दर्शनपाल हे देखील उपस्थित होते. टिकरी सीमेवरही शेतकऱ्यांनी तिरंगा रॅली काढली. गाझीपूर येथेही मोर्चा काढण्याची योजना होती पण संध्याकाळ असल्याने मोर्चा काढण्यात आला नाही.
६. उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन्ही बाजूंनी गाझीपूर सीमा बंद केली आहे. लोकांना तिथे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यानंतर गुरुवारी येथे पाणीपुरवठाही बंद करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी हरियाणाला जोडणारा रस्ता जेसीबीने खोदला आहे.
७. गाझीपूर सीमेवर गुरुवारी सायंकाळी भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी वादग्रस्त विधान केले. म्हणाले – “धरणे बंद होणार आणि अटकही होणार नाही. जर गोळी चालवायची असेल तर ती येथे चालवावी. या विधानानंतर थोड्याच वेळात एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये टिकैत रडत होते. ते म्हणाले, ‘भाजपचे लोक शेतकर्यांच्या हत्येचा कट रचत आहेत. मी शेतकऱ्यांना असे काही होऊ देणार नाही. जर कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन.”
८. २६ जानेवारी रोजी गाझीपूर येथे २५ हजार शेतकरी होते. गुरुवारी केवळ ५००० निदर्शक उरले आहेत. सिंघू सीमेवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही संख्या ८० हजारांवर पोहोचली होती. आता ही संख्या २५ ते ३० हजारांच्या दरम्यान राहिली आहे.
९. २६ जानेवारीच्या हिंसाचारात सामील झालेल्या ४४ शेतकरी नेत्यांविरूद्ध गुरुवारी लुकआऊट नोटिस बजावण्यात आल्या आहेत. या नोटिस सीमावर्ती भागात तंबूंवर देखील पाठवण्यात आल्या आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणात त्यांच्यावर कारवाई का होऊ नये, असा सवाल शेतकरी नेत्यांना केला आहे.
१०. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार शीख समुदाय हा कट्टर देशभक्त आहे आणि त्याना बदनाम केलं जात आहे. भाजपचे लोक शेतकर्यांची बदनामी करीत आहेत. तसेच २६ जानेवारीला दिल्लीतील हिंसाचाराची चौकशी झाली पाहिजे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन आणि दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष राघव चड्ढा यांना पोलिसांनी सिंघू सीमेवर आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे.