मुक्तपीठ टीम
रविवारी संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. मात्र या सामन्याला भाजपा खासदार गिरीराज सिंह यांच्यानंतर योगगुरू बाबा रामदेव यांनीही विरोध केला आहे. हा क्रिकेट सामना राष्ट्रहित आणि राष्ट्र धर्माच्या विरोधात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. क्रिकेट आणि दहशतीचा खेळ एकत्र असू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
नियंत्रण रेषेवर तणाव असताना रविवारी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे, असे विचारले असता रामदेव म्हणाले, “मला वाटते की अशा परिस्थितीत क्रिकेट सामना ‘राष्ट्रधर्मा’च्या विरोधात आहे, राष्ट्र हितासाठी योग्य नाही. क्रिकेटचा खेळ आणि दहशतीचा डाव एकत्र असू शकत नाही.
इंधन भडक्यावर खुलासा!
काळा पैसा परत आल्यावर इंधनाच्या किमती कमी होतील, याबद्दल काँग्रेस सत्ताकाळात केलेल्या ट्वीटवरून बाबा रामदेव ट्रोल होत आहेत. त्याबद्दल बाबा रामदेव म्हणाले की, त्यांनी पेट्रोलची किंमत कच्च्या तेलाशी सुसंगत असावी असा सल्ला दिला होता आणि कमी कराचा प्रस्ताव ठेवला होता. सरकारला अनेक कल्याणकारी कार्यक्रम चालवावे लागतात आणि आर्थिक आव्हानांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे सरकारला कर कमी करता येत नाही. मात्र, एक दिवस स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.