मुक्तपीठ टीम
मुंबईची लोकल फेऱ्या म्हणजे मुंबईची जीवनरेखा. आता २९ जानेवारीपासून मुंबईत आणखी २०४ लोकल गाड्या धावणार आहेत. या वाढीव २०४ लोकल गाड्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे या मार्गांवर धावतील. दररोज एकूण २,९८५ लोकल चालवल्या जातील. सध्या मुंबई उपनगरी नेटवर्कवर २,७८१ फेऱ्या आहेत, त्यामध्ये पश्चिम रेल्वेवर १,२०१ आणि मध्य रेल्वेवर १,५८० फेऱ्या आहेत.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या उपनगरी फेऱ्या सध्याच्या १,५८० वरून १,६८५ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेच्या १,३०० फेऱ्या असतील.
रेल्वे मंत्रालय व राज्य सरकार यांनी परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच मुंबई उपनगरी नेटवर्क गाड्यांमधून प्रवास करता येईल. त्यात काही बदल झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इतरांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि सर्वसाधारण प्रवाशांना जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर गर्दीवर नियंत्रण कसे ठेवणार याबद्दल चर्चा केली.
सर्व प्रवाशांना लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पाहा व्हिडीओ: