मुक्तपीठ टीम
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील आयकर धाडसत्रामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे आक्रमक पावित्र्यात आहे. मात्र, अजित पवारांसह सत्ताधारी आघाडीतील अनेक नेत्यांना लक्ष्य करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांनी आता नवा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा आणखी एक नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर चार आयकर धाडसत्र सुरू होते. किरीट सोमय्यांनी अजित पवारांना इशारा देत म्हटलं की, “जरंडेश्वरचा मालक कोण आहे? किती हजारांचे घोटाळे केले? या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहणार.”
बुधवारी नवा गौप्यस्फोट!
बुधवारी सोमय्या पुण्यात जाणार आहे. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची आणखी एक पोलखोल करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. पवारांनी खूप घोटाळे केले आहेत, लूट माजवली. पवार भलेही शेतकरी दादा, शेतकरी दादा म्हणत असतात, पण रोहीत पवार, सुनेत्रा पवार यांच्या नावाने कारखाने आहेत. ते लुटत असतात.
आघाडीने लुटले, मोदींनी करुन दाखवले!
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून धाड सुरू आहे. त्यामुळे आता हा घोटाळा पाच हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा होत आहे. त्यामुळे यांना तुरुंगात जावेच लागेल. कायद्याने होणाऱ्या कारवाईला सामोरे जावेच लागेल. त्यांनी लुटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल असे मविआला स्वप्नातही वाटलं नसेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तसे करून दाखवलं, असंही ते म्हणाले.
ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनी पुरावे खोटे ठरवले नाहीत!
आतापर्यंत अजित पवार, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर आणि नवाब मलिक यांच्यावर मी आरोप केले. पण त्यांच्यापैकी एकानेही मी दिलेले पुरावे खोटे आहेत हे सांगितले नाही. पुरावे खोटे ठरवण्याची एकाचीही हिंमत झाली नाही. ज्यांनी घोटाळे केले त्यांना हिशेब द्यावेच लागतील, असेही सोमय्या म्हणालेत.