मुक्तपीठ टीम
इंदूरच्या एका हायटेक सायबर गुन्ह्यांतील दोन फरार आरोपींना वाशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने खारघर परिसरातून शिताफीने अटक केली. नरेंद्र सिंग ऊर्फ दशरथसिंग राजपुरोहित आणि विजयसिंग ऍबेसिंग सोलंकी अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही मूळचे राजस्थानच्या जालोर, बिगतारा आणि बिनमलचे रहिवाशी आहेत.
राजस्थानच्या इंदूर शहरातील हायटेक सायबर गुन्ह्यांतील दोन फरार आरोपी खारघर परिसरात लपले आहेत. दोन्ही आरोपी फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून ते खारघर येथून पळून जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सहपोलीस आयुक्त जय जाधव, पोलीस उपायुक्त मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, सम्राट वाट, पोलीस हवालदार काकडे, मोरे, पोलीस नाईक पाटील, पोलीस शिपाई वाघ, धोंडे यांनी खारघर येथील कोपरगाव परिसरातून नरेंद्रसिंग आणि विजयसिंग या दोघांना अटक केली.
पोलीस तपासात नरेंद्रसिंग हा कमिशन एजंट तर विजयसिंग हा चालक म्हणून काम करत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक हुंडाई आय-२० कार, वेगवेगळ्या कंपनीचे सहा मोबाईल, महत्त्वाच्या व्यक्तीची माहिती असलेल्या चार पुस्तिका, ऍक्सिस बँकेचे एटीएम डेबीट कार्ड जप्त केले आहेत. पोलीस तपासात या दोघांविरुद्ध इंदूरच्या सायबर सेल पोलीस ठाण्यात ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४०६, ४२०, ३४ भादवी सहकलम ६६ ड आयटी कलमांतर्गत एक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. ही टोळी आपसांत संगनमत करुन एका मोठ्या ज्वेलर्सची आयडेन्टीटी घेऊन फोनवरुन दुसर्या ज्वेलर्स व्यापार्याला ते मोठे ज्वेलर्स व्यापारी असल्याचे सांगत, त्यांच्यावर स्वत:चा प्रभाव पाडून त्यांना व्यवहारासाठी पैशांची गरज आहे, असे सांगून त्यांच्याकडून लाखो रुपयांचे पेमेंट घेत होते.
दागिन्यांची मोठी ऑर्डर मिळत असल्याने संबंधित व्यापारी त्यांना ही रक्कम देत होते. मात्र ही रक्कम मिळाल्यानंतर ही टोळी मोबाईल फोन करुन पळून जात होती. मुंबईसह इंदूर शहरात या टोळीने अशाप्रकारे अनेकांची फसवणुक केल्याची कबुली दिली आहे. या दोघांच्या अटकेनंतर त्यांची माहिती इंदूरच्या सायबर सेल पोलिसांना देण्यात आली होती. नवी मुंबईत आलेल्या या पथकाला नंतर या दोन्ही आरोपींचा ताबा देण्यात आला. त्यांना घेऊन संबंधित पोलीस पथक पुढील चौकशीसाठी इंदूर येथे गेल्याचे पोलिसांनी सांगितले.