मुक्तपीठ टीम
रविवारी उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये दोन मंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी निदर्शेने करणाऱ्या चार शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाने गाडीखाली चिरडले आहे. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात चारजणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याआधी केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आव्हान देणारे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यामुळे शेतकरी निदर्शनासाठी जमले होते. या घटनेनंतर विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्याला लखीमपूरमध्ये जाण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे संताप अधिकच वाढत आहे. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांचं हत्याकांड कसं घडलं ते ठळक मुद्द्यांमध्ये समजून घेवूया.
लखीमपूर शेतकरी हत्याकांडातील २० महत्वाचे मुद्दे
१) लखीमपूर उत्तरप्रदेशात आहे. स्थानिक खासदार अजय मिश्रा हे केंद्रात मोदी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री आहेत.
२) रविवारी मिश्रांच्या मतदारसंघात काही कार्यक्रम होते. त्यासाठी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आले होते.
३) त्या दौऱ्याआधी निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना उद्देशून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यामुळे दौऱ्याच्यावेळी निदर्शने झाली.
४) केंद्रीय मंत्रीपदावर असणाऱ्या अजय मिश्रा यांनी “मी फक्त मंत्री-खासदार नाही…लक्षात ठेवा. दहा पंधरा शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. सरळ करून टाकेन” असे धमकावणारे वक्तव्य केले.
५) त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांचं हेलिकॉप्टर उतरणारं असलेल्या हेलिपॅडचा कब्जा घेण्याचं आंदोलन केलं.
शेतकऱ्यांना कसं चिरडलं?
१)आंदोलनानंतर शेतकरी परतत असताना रस्त्यातही ते घोषणा देत चालले होते.
२)तेवढ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा ताफा आला.
३)मुलगा आशिष मिश्राच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले. चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
४) त्यानंतर शेतकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला. त्यात चौघांचा बळी गेला.
५) त्यानंतर लखीमपूर खेरीतील तणाव प्रचंड वाढला.
पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा, त्यांचे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांना सुरक्षितस्थळी हलवले.
शेतकऱ्यांच्याच बदनामीचा प्रयत्न
१)लखीमपूर खेरीचे एएसपी अरुण कुमार सिंह यांनी आठ मृत्यूंची पुष्टी केली आहे.
२)मृतांपैकी चार शेतकरी होते आणि उर्वरित चार एकतर शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या वाहनात होते किंवा मंत्र्यांच्या ताफ्यातील इतर वाहनांमध्ये बसले होते. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी दोन वाहनेही जाळली.
३)गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी या घटनेत आपल्या मुलाचा सहभाग नाकारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. उलट शेतकऱ्यांमध्ये घुसलेल्या काही समाजकंटकांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला.
४) माध्यमांपैकी काहींना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या अराजकाच्या बातम्या पेरण्यात आल्या.
५) मात्र, वाढत्या जनप्रक्षोभामुळे अखेर पोलिसांनी रात्री उशीरा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात एफआयआर दाखल केला.
आता काय घडतंय?
१)लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडानंतर उत्तरप्रदेश सरकारने कठोर पावलं उचलली.
२) सरकारने लखीमपूरच्या २० किमी परिसरातील इंटरनेट सेवा बंद करणे योग्य मानले जाऊ शकते, पण राजकीय नेत्यांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली.
३)काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना रात्री लखीमपूरला जाण्यापासून रोखण्यात आलं.
४)समाजवादी पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला.
५)इतर राज्यांमधील नेते लखीमपूरला पोहचू नयेत यासाठी त्यांना लँडिंग अनुमती न देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकरी
१)गुरविंदर सिंग, वय – २० वर्षे, रहिवासी – मकरोनिया नानपारा
२)दलजीत सिंग, वय – ३५ वर्षे, रहिवासी – बंजारा थाथा नानपारा
३)नक्षत्र सिंह, वय – ६५ वर्षे, रहिवासी – नयापूरवा धौराहारा
४)लव्हप्रीत सिंग, वय – २० वर्षे, रहिवासी – चौखरा फार्म मजगाई पालिया