मुक्तपीठ टीम
आजचा प्रजासत्ताक दिन वेगळा ठरणारा आहे. ऐतिहासिक आहे. देशाची राजधानी दिल्लीत नेहमीच्या प्रजासत्ताक संचलनानंतर आज शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर संचलन आहे. आपल्या संघटनांचे, पंथाचे झेंडे आणि त्याचबरोबर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवत शेतकरी ट्रॅक्टर संचलनात भाग घेतील. लाखोंच्या संख्येने ट्रॅक्टर संचलनात सहभागी असणार आहेत.
शेतकऱ्यांना मदत लागली तर आणि त्यांनी शिस्त पाळावी यासाठी किसान स्वयंसेवक संपूर्ण संचलनाच्या मार्गावर सज्ज असतील. अर्थात दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा पथकेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. लाखो ट्रॅक्टर टिकरी, सिंघु आणि गाजीपूर सीमेवर पोहोचले होते. आज जवळजवळ दहा लाख ट्रॅक्टर येथे उपस्थित आहेत.
ट्रॅक्टर संचलनासाठी परवानगी मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवरून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची एक बाजू मोकळी केली आहे. आंदोलन सुरू असलेल्या जागेवरून जवळजवळ एक किलोमीटर पुढे सिमेंटचे बॅरिकेड्स आणि लोखंडाचे मोठे कंटेनर काढून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. त्यासोबतच दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनीही नियोजित मार्गावर बंदोबस्त वाढवला आहे. संचलनामध्ये सर्वाधिक ट्रॅक्टर टिकरी सीमेवर आले आहेत. त्यामुळे तेथे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
शिस्तीसाठी नेत्यांवर जबाबदारी
संचलनादरम्यान कोणीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये, याची हमी शेतकरी नेत्यांकडून घेण्यात आली आहे. संचलना दरम्यान काही गोंधळ झाल्यास ज्येष्ठ शेतकरी नेते यांना जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
ट्रॅक्टर संचलनासाठी अटी-शर्ती
- दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना अट घातली आहे की, ट्रॅक्टरवर तीनपेक्षा जास्त लोक बसणार नाहीत.
- संचलनामध्ये टिकरी ते दिल्ली या मार्गावर ट्रॅक्टर संचलना दरम्यान सुरक्षा दल आणि शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही परवानगी नसणार
- २५ जानेवारी संध्याकाळपासूनच मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत
ट्रॅक्टर संचलनात सुविधा-शिस्तीसाठी हजार शेतकरी स्वयंसेवक
- ट्रॅक्टर संचलनासाठी एक हजार स्वयंसेवकही तैनात केले गेले आहेत. त्यांची यादी पोलिसांनाही देण्यात आली आहे
- स्वयंसेवक ठरलेल्या गणवेशात असतील
- स्वयंसेवकांमध्ये प्रथमोपचार, पाणी आणि चहा पुरवणाऱ्यांशिवाय ट्रॅक्टर मेकॅनिकही आहेत
- त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे
ट्रॅक्टर संचलनाचा मार्ग
- ट्रॅक्टर संचलनाचा मार्ग टिकरी बॉर्डरपासून ६३ ते ६४ किमी
- सिंहू बॉर्डरपासून ६२ ते ६३ किमी आणि गाझीपूर बॉर्डरपासून ४६ किमी एवढा ठरविण्यात आला आहे.
- केवळ सिंहू, टिकरी आणि गाझीपूरच्या सीमेवरूनच दिल्लीत शेतकरी आंदोलक प्रवेश करू शकतील.
- तसेच पलवल आणि शाहजहांपूर सीमेवर बसलेल्या शेतकर्यांना त्या मार्गाने दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही.
शेतकरी संघटना, खालसा पंथ आणि तिरंगा झेंडा
संचलनामध्ये सहभागी झालेल्या ट्रॅक्टरवर तीन प्रकारचे झेंडे फडकत आहेत. यात शेतकरी संघटना, राष्ट्रीय ध्वज आणि खालसा पंथाचा ध्वज समाविष्ट आहे. संयुक्त किसान मोर्चाने एखादी संस्था आपल्या ट्रॅक्टरवर तिरंगा लावणार असल्यास कोणाकडूनही तिरंग्याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले गेले आहे.