मुक्तपीठ टीम
मुंबईतील नौदल पश्चिम कमांडने निवासी भागात वापरण्यासाठी पर्यावरणपूरक १९ नवीन बहुउद्देशीय इलेक्ट्रिक वाहने (EVs) कमांडमध्ये समाविष्ट केली आहेत. ही वाहने भरवशाची, उर्जा-कार्यक्षम आणि कमी देखभाल लागणाऱ्या बॅटरीने सुसज्ज आहेत. याआधी गेल्या आठवड्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही महापालिकेसाठी इलेक्ट्रिक कार ण्यात आली. त्यामुळे आता महत्वाच्या व्यक्तींच्या पर्यावरणपूरक प्रवासातून प्रेरणा घेऊन सामान्यांमध्येही ई-वाहनांचं आकर्षण वाढण्यास मदत मिळू शकेल.
०८ सप्टेंबर २१ रोजी, पश्चिम विभागाच्या नेव्ही वाइव्हज वेलफेअर असोसिएशनच्या (एनडब्ल्यूडब्ल्यूए) अध्यक्षा श्रीमती कला हरी कुमार यांनी या इलेक्ट्रिकल वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. या इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर नौदल कर्मचारी आणि निवासी भागात मालाच्या वाहतुकीसाठी केला जाईल.
वर्ष २०२४ पर्यंत हवेतील प्रदूषणकारी घटक २०-३०% कमी करण्यासाठी भारत सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या वाहनांचा समावेश भारतीय नौदलाच्या विविध हरित उपक्रमांपैकी एक आहे.ही वाहने वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील आणि पर्यावरण संरक्षणाला मदत करतील.
मुंबईच्या महापौरांनाही ईलेक्ट्रिक कार
पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्याचा संदेश सामान्य मुंबईकरांना देण्याच्या हेतूने मुंबई महानगरपालिकेने पाच इलेक्ट्रिक कार घेतल्या आहेत. मनपाच्या ताफ्यातील या ई-कारपैकी एक ई-कार परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार यादव यांच्या हस्ते महापौर किशोरी पेडणेकर यांना महापौर निवासस्थानी सोपवण्यात आले. याप्रसंगी उपप्रमुख अभियंता (घ.क.व्य.) (परिवहन) सुनील सरदार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी उपस्थित होते.
मुंबई मनपाच्या ताफ्यात प्रथमच पाच ई-वाहनं
- मुंबई महानगरपालिकेकडे असणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सध्या ९६६ वाहने आहेत.
- या वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांप्रमाणेच सीएनजी सारख्या पर्यावरणपूरक इंधनांचा वापर करणाऱ्या वाहनांचाही समावेश आहे.
- मनपाच्या वाहन ताफ्यामध्ये आता पाच इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.
- टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लस’या पाच ई-कार या केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस या कंपनीकडून ‘ड्राय-लीज’ पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत.
- सदर वाहनांसाठी दरमहा रुपये २७ हजार इतका खर्च असणार असून यामध्ये देखभाल व दुरुस्तीचाही समावेश आहे.
- या ई-कार साधारणपणे पुढील ८ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत.