मुक्तपीठ टीम
भारतीयांना भेडसावणारी भीती अमेरिकेत प्रत्यक्षात येताना दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याचा इशारा भारतात दिला जात होता. परंतु आता अमेरिकेत ही भीती प्रत्यक्षात येताना दिसत आहे. कारण अमेरिकेत कोरोना रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. सध्या अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये एकूण २३९६ कोरोना बाधित मुले दाखल आहेत. जी आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.
एवढेच नव्हे तर गेल्या एका आठवड्यात अडीच लाखांहून अधिक कोरोना बाधित मुलांची नोंद करण्यात आली. हा आतापर्यंतचा हाययेस्ट रेकॉर्ड आहे. कोरोना चे जागतिक संकट ओढवल्यापासुन एका आठवढ्यातील बाधित मुलांची ही सर्वाधिक नोंद आहे.
अमेरिकेत लहान मुलांना अधिक संसर्ग
- सध्या अमेरिकेत नवीन कोरोना रुग्णांमध्ये २६ टक्के केवळ लहान मुलं आहेत.
- ५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान म्हणजे सुमारे चार आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाने ७ लाख ५० हजार नवीन मुले बाधित झालीत.
- कोरोनाबाधितांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे.
- तरीही कोरोनामुळे आत्तापर्यंत ५२० मुलांचा मृत्यू झाला आहे.
लसीकरण न झालेल्या मुलांना अधिक संसर्ग.
- लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये अधिक संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे.
- २५% मुलांचे लसीकरण पुर्ण झाले आहे.
- अमेरिकेत १२ वर्षे आणि त्यावरील मुलांचे लसीकरण केले जात आहे.
- १२ ते १५ वर्षे वयोगटातील २५% अमेरिकन मुलांना कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
- या वयोगटातील ३३% मुलांना लसीचा एकच डोस देण्यात आला आहे.
- १६ ते १७ वर्षांच्या मुलांमध्ये ३७% मुलांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर ४५% मुलांना एकच डोस देण्यात आला आहे.
रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांपैकी अर्ध्या मुलांना कोणताही पूर्व आजार नाही. सीडीसीच्या मते, रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे ४६.४% अमेरिकन मुलांना यापुर्वी कोणताही आजार नव्हता. यामुळे निरोगी मुलांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कोणत्याही पूर्वीच्या आजाराने ग्रस्त मुलांपेक्षा कमी असल्याचा समज चुकीचा असल्याचे स्पष्ट होत आहे.