मुक्तपीठ टीम
आता तुम्हाला जर नवं घर किंवा अन्य मालमत्ता खरेदी करायची असेल तर गृहकर्जासाठी बँकेतच गेलं पाहिजे असं नाही. तुम्हाला आता पोस्ट कार्यालयातूनही मालमत्ता खरेदीसाठी गृहकर्ज सुविधा मिळू शकेल.
संचार मंत्रालय, टपाल खात्याच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), आणि देशाची प्रमुख गृहनिर्माण वित्त कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) हे गृहकर्ज सुविधेसाठी एकत्र आलेयत. ही नवी भागिदारी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या साडेचार कोटी ग्राहकांना गृह कर्ज उत्पादने पुरवणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचे पोस्ट कार्यालयांमध्ये ६५० शाखांचे मजबूत आणि व्यापक जाळे आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सची गृह कर्ज सुविधा संपूर्ण भारतातील एक लाख ३६ हजारापेक्षा जास्त बँकिंग ऍक्सेस पॉइंट्सद्वारे ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाईल.
नेमकं काय ठरलं?
- संचार मंत्रालय, टपाल खात्याच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), आणि देशाची प्रमुख गृहनिर्माण वित्त कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
- सर्व गृह कर्जासाठी क्रेडिट अंडरराइटिंग, प्रोसेसिंग आणि वितरण हे एलआयसीएचएफएल करेल आणि सोर्सिंगसाठी आयपीपीबी जबाबदार असेल.
- एलआयसीएचएफएलसोबतची भागीदारी ही आयपीपीबीची उत्पादने आणि सेवांची श्रेणी वाढवण्याच्या आणि देशभरातील वैविध्यपूर्ण ग्राहकांच्या बँकिंग आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे.
- सध्या, आयपीपीबी अग्रगण्य विमा कंपन्यांसह भागीदारीद्वारे विविध सामान्य आणि जीवन विमा उत्पादने वितरीत करत आहे आणि ग्राहकांसाठी कर्ज सहजतेने मिळण्यासाठी हा सेवा विस्तार आहे.
आयपीपीबीचे सुमारे २००,००० टपाल कर्मचारी (पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक) मायक्रो-एटीएम आणि बायोमेट्रिक उपकरणांसह सुसज्ज असून नावीन्यपूर्ण डोअरस्टेप बँकिंग सेवेद्वारे एलआयसीएचएफएलचे गृहकर्ज देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, पगारदार व्यक्तींसाठी ५० लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी ६.६६% दराने गृह कर्ज देते. देण्यात आलेला व्याजाचा दर कर्जदाराच्या पत संबंधी पात्रतेशी जोडलेला आहे, जो त्यांच्या सिबिल स्कोअरमध्ये दिसून येतो.
एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे ज्य़ेष्ठ नागरिकांसाठी कर्ज
- गृहवरिष्ठ – हे पीएसयू विमाधारक, केंद्र/राज्य सरकार, रेल्वे, संरक्षण, बँकांचे सेवानिवृत्त किंवा कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आहे.
- ज्यात परिभाषित लाभ पेन्शन योजनेअंतर्गत ते निवृत्तिवेतनासाठी पात्र आहेत. कर्ज घेण्याच्या वेळी कर्जदाराचे वय ६५ वर्षांपर्यंत असू शकते.
- कर्जाची मुदत ८० वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त ३० वर्षांपर्यंत,यापैकी जे आधी असेल.
- या उत्पादनाअंतर्गत एलआयसी एचएफएल कर्जदाराला कर्जाच्या कार्यकाळात ६ हप्ते माफ करते.