मुक्तपीठ टीम
सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का दिला आहे. एलपीजी सिलिंडर आणखी महाग झाला आहे. आजपासून विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीनंतर आता मुंबईत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून ८८४ रुपये ५० पैसे झाली आहे. अवघ्या १३ दिवसांपूर्वीच सिलिंडरचे दर २५ रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर त्यापूर्वी एक जुलै रोजी २५ रुपये २५ पैशांची वाढ झाली होती. त्यामुळे कोरोना संकटातील या दोन महिन्यातच गॅसची किंमत ७५ रुपयांनी भडकली आहे.
स्वयंपाकाचा गॅस कुठे किती महाग?
- आता १४.२ किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडर
- मुंबई-दिल्ली – ८८४.५ रुपये
- कोलकाता ९११ रुपये
- चेन्नई ९००.५ रुपये
घरगुती एलपीजी सिलिंडरच नाही, तर १९ किलो असणारा औद्योगिक वापरासाठीचा सिलिंडरही महाग झाला आहे. त्याच्या किंमतीत ७५ रुपयांची वाढ आहे.
२०२१च्या आठ महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर १९० रुपयांनी महागला
- एक जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यांमध्ये सिलिंडरच्या किमतींमध्ये १९० रुपयांची वाढ झाली आहे.
- एक जानेवारी रोजी मुंबई-दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये होती.
- आता किंमत वाढून ८८४.५ रुपयांवर पोहोचली आहे.
- २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात सिलिंडर दर वाढून ७१९ रुपये इतकी झाली आहे.
- त्यानंतर सिलिंडच्या किंमती १५ फेब्रुवारी रोजी ७६९ रुपये
- २५ फेब्रुवारी रोजी ७९४ रुपये,
- १ मार्च रोजी ८१९ रुपये,
- १ एप्रिल रोजी ८०९ रुपये
- १ जुलै रोजी ८३४.५ रुपये
- १८ ऑगस्ट रोजी ८५९.५ रुपये
- १ सप्टेंबर रोजी ८८४ रुपये ५० पैसे झाली आहे.
गॅस सिलिंडर महागाईचा फटका सर्वांनाच!
- सध्या केंद्र सरकार एका वर्षात ग्राहकांना १२ घरगुती गॅस सिलिंडर्सवर अनुदान देतं.
- जर एखादा ग्राहक याहून अधिक वापर करत असेल तर त्याला बाजारभावाने खरेदी करावी लागते.
- अपवाद वगळता कोणत्याही भारतीय कुटुंबाचे एका महिन्याचा स्वयंपाक आणि अन्य कामं एका सिलिंडरमध्ये भागत नाहीत.
- त्यांना काही सिलिंडर घ्यावेच लागतात.
- त्यासाठी मग महाग होत असलेले विनाअनुदानित गॅस सिलिंडर्स घ्यावेच लागतात.
- तेल कंपन्यांनी दर महिन्याच्या पहल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती जाहीर करतात.