मुक्तपीठ टीम
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. यानिमित्त आठवणी जाग्या झाल्या त्या महाराष्ट्रातील भारतमातेच्या सुपुत्रांच्या महाकलाकृतीची. १९९७ हे भारतीय स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. तेव्हा काहीतरी आगळंवेगळं करून आपल्या देशातील सुपुत्रांना वंदन करण्याची कल्पना शिल्पकार आणि चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या मनात आली. त्यानुसार त्यांनी नगर शहरातील महावीर कला दालनात जगातील एकमेव असे महाचित्र साकारले.
भारतमातेचे ५०० सुपुत्र महावीर कला दालनातील भिंतीवर साकारले आहेत. कुठेही खोडरबर न वापरता त्यांनी ही ही कलाकृती साकारली आहे. स्वातंत्र्यांचं अमृत महोत्सवी वर्ष हे त्यांच्या महाकलाकृतीचेही रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
जगातील एकमेवाद्वितिय कलाकृतीविषयी घडणारे कलाकार काय सांगतात?
रात्रंदिवस मेहनत करून ही अजरामर कलाकृती साकारताना मिळालेला आनंद हा खूप समाधान देणारा आहे. आपल्या देशातील महनीय व्यक्तींना या कलाकृतीच्या माध्यमातून मी मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. हा ठेवा तसा राजाश्रयापासून दुर्लक्षित आहे. पण कला रसिक जेव्हा कधी ही कलाकृती पाहतात तेव्हा ते अचंबित होऊन मला व माझ्या कलेला दाद देतात. माझ्या स्वतःसाठी ही कलाकृती सर्वोच्च आनंद देणारी आहे. आज ही मोठी कलाकृती किमान देशवासियांसाठी तरी कायमस्वरूपी जतन व्हावी, भारतमातेच्या महान सुपुतांना कायम वंदन व्हावे हीच अपेक्षा!
– प्रमोद कांबळे, चित्र शिल्पकार, नगर