मुक्तपीठ टीम
बँक लॉकर हे देखील बॅकांच्या अनेक सेवांमध्ये महत्वाची सुविधा आहे. तुम्हीही जर बँक लॉकरचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. लवकरच बँक लॉकर्सशी संबंधित नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँकेने नवीन नियम जारी केले आहेत. हे नवीन नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, केवायसीच्या माध्यमातून लॉकर सुविधा अशा लोकांनाही दिली जाऊ शकते ज्यांचे बँकेत खाते नाही. मात्र, संबंधित व्यक्तीला लॉकर सुविधा पुरवायची की नाही हे बँकांवर अवलंबून असेल. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमाअंतर्गत, आग, चोरी, इमारत कोसळणे किंवा बँक कर्मचाऱ्यांकडून फसवणूक झाल्यास बँकांचे दायित्व त्याच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट मर्यादित असेल.
प्रत्येक बँकेला स्टॅम्पद्वारे ग्राहकांशी करार करावा लागेल. पुढील वर्षापासून बिगर बँकिंग ग्राहकांना लॉकरची सुविधाही मिळणार आहे. मात्र, ते पूर्णपणे बँकांवर अवलंबून असेल. कोणत्याही लॉकरचा बेकायदेशीर वापर झाल्याचा संशय असल्यास, बँक त्याच्यावर कारवाई करण्यास देखील सक्षम असेल.
बँकेत केवायसी पूर्ण केल्यानंतर ग्राहक लॉकरसाठी अर्ज करू शकतात. नवीन नियम विद्यमान ग्राहकांनाही लागू होतील. बँकांना सर्व शाखांमधील रिक्त लॉकर्सचा तपशील कोर बँकिंग प्रणालीला द्यावा लागेल जेणेकरून ग्राहक ऑनलाइन अर्ज करू शकतील. भूकंप, पूर यासारख्या दैवी आपत्तीमुळे लॉकरचे झालेले नुकसान बँका भरून काढणार नाहीत.
वार्षिक लॉकर शुल्क
- लहान लॉकर्ससाठी वार्षिक २,००० रुपये शुल्क
- मेट्रो शहरांमध्ये लॉकर शुल्क म्हणून ४,००० रुपये
- मोठ्या लॉकरसाठी जीएसटीसह ८,००० रुपये वार्षिक शुल्क आहे
लॉकर ग्राहकांना सांगितल्यानंतरच शिफ्ट होईल
- बँका ग्राहकांना माहिती दिल्यानंतरच लॉकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतील.
- मुदत ठेव लॉकर भाड्याने म्हणून वापरली जाऊ शकतात.
- बँका ग्राहकांना प्रत्येक वेळेस ई-मेल आणि एसएमएसद्वारे माहिती देतील.
बँकांच्या लॉकरसेवांमध्ये नेमके काय बदल?
- बँक आणि ग्राहक यांच्यातील करार मुद्रांकावर असेल.
- लॉकर वापरल्यावर बँकांना एसएमएस आणि ईमेल संबंधित ग्राहकाला पाठवावे लागतील.
- लॉकरसाठी ग्राहकांकडून अर्ज घेतला जाईल. त्यानंतर नंबर जारी केला जाईल.
- लॉकरची माहिती कोर बँकिंग प्रणालीशी जोडली जाईल.
- लॉकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवल्यावर ग्राहकांना अगोदर सूचना द्यावी लागेल.
- बँकांना स्ट्रॉंग रूम किंवा व्हॉल्ट्सची मजबूत सुरक्षा करावी लागेल.
- लॉकर रूममध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्याचे सीसीटीव्ही फुटेज किमान १८० दिवस ठेवावे लागतील.
- एफडी लॉकर भाडे म्हणून वापरता येते. भाड्याची रक्कम त्याच्या व्याजातून कापली जाऊ शकते.