मुक्तपीठ टीम
गेली दोन वर्षे कोरोना महामारीचा फटका अर्थव्यवस्थेला बसल्याने सामान्यांचे खिसे फाटले आहेत. कोरोनाने दिलेल्या आर्थिक जखमेवर महागाईचं मिठ चोळलं जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे त्रस्त झालेल्या लोकांना आणखी एक धक्का बसला आहे. मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या. १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर आता मुंबई आणि दिल्लीत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून ८५९.५० रुपये झाली आहे. यापूर्वी १ जुलै रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली होती. या नव्या दरवाढीमुळे या वर्षी गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १६५ रुपये ५० पैशांची एकूण वाढ झाली आहे.
देशातील सर्वात महाग गॅस यूपीत
या ताज्या वाढीनंतर देशाच्या आर्थिक राजधानीत १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत ८५९.५० रुपयांवर गेली आहे. राजधानी दिल्लीतही तेवढीच किंमत आहे. कोलकातामध्ये ८८६ रुपये, चेन्नईमध्ये ८७५.५० रुपये, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सर्वाधिक ८९७.५० रुपये १४.२ किलो विनाअनुदानित सिलिंडरसाठी द्यावे लागतील. त्याचबरोबर, अहमदाबादमधील या ताज्या वाढीनंतर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ८६६.५० रुपये मोजावे लागतील.
या वर्षी गॅस सिलिंडर १६५.५० रुपयांनी महाग!
- सहसा, पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवतात.
- पण यावेळी त्यांनी महिन्याच्या मध्यातच किमती वाढवण्याचा निर्णय घेतला.
- या वर्षी १ जानेवारी रोजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
- फेब्रुवारीमध्ये पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली.
- त्यानंतर भाव वाढून ७९४ रुपये झाले.
- मार्चमध्ये असताना, पुन्हा एकदा किमतींमध्ये वाढ झाली.
- एप्रिलमध्ये थोडा दिलासा देत किंमत १० रुपयांनी कमी करण्यात आली.
- यावर्षी आतापर्यंत गॅस सिलिंडरच्या किमतीत १६५.५० रुपयांची वाढ झाली आहे.
गॅस महागाई…कुठे, कधी, किती?
ऑगस्ट जुलै जून
• मुंबई 859.50 834.50 809
• दिल्ली 859.50 834.50 809
• कोलकाता 886 861 835
• चेन्नई 875.50 850.50 825