मुक्तपीठ टीम
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांची जवळपास २३४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचा समावेश आहे.
विवेक पाटील हे कर्नाळा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. या बँकेत सुमारे ६५० कोटींचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना १५ जूनला ईडीने अटक केली होती. त्यानंतर आज ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये कर्नाळा स्पोर्टस अकादमी तसेच त्यांच्या नावे असलेल्या जमिनींचा समावेश आहे.
कर्नाळा बँक लुटीविरोधातील संघर्षाला यश
- कर्नाळा नागरी सहकारी बँक ही रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध बँक.
- या बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार गेली अनेक वर्षे गाजत आहे.
- माजी आमदार विवेक पाटील यांनी जवळपास ६३ बोगस खात्यांतून पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
- ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू हे गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहेत.
- पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनीही खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.
- बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत काही महिन्यांपूर्वी मोर्चे देखील काढण्यात आले होते.
विवेक पाटलांमुळेच कर्नाळा बँक बुडाल्याचा आरोप
- ईडीच्या चौकशीमुळे बँक आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर टांगती तलवार होती.
- कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा ७६ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
- त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.