मुक्तपीठ टीम
नागपूर पोलिसांच्या वर्दीत दडलेला संवेदनशील माणूस सध्या चर्चेचा विषय झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला आहे. घटना आहेच तशी. नागपूरच्या एका रिक्षा चालकाला वाहतूक पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पकडले होते. त्याला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. रिक्षा चालकाची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या मुलाची पिग्गी बँक वाहतूक विभागाच्या कार्यालयात नेली आणि दंड जमा करण्याचा प्रयत्न केला.
वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय मालवीय यांनी नागपुरातील सीताबुल्डी परिसरात रहदारीचे नियम मोडल्याबद्दल रोहित खडसे नावाच्या रिक्षा चालकाला २००० रुपयांचा दंड ठोठावला. पोलिसांनी रिक्षा जप्त करून दंडाची रक्कम जमा करण्यास सांगितले. यानंतर चालक घरी गेला आणि आपल्या मुलाची पिग्गी बँक घेऊन अजय मालवीय यांच्यासमोर पोहोचला.
पोलिसांनी पिग्गी बँक परत केली, दंड स्वत: भरला!
- रिक्षा चालक रोहितचा उदास चेहरा आणि त्याच्या हातात पिग्गी बँक पाहून, जेव्हा अधिकाऱ्याने पिग्गी बँक आणण्याचे कारण विचारले, तेव्हा रोहितने सांगितले की, पैसे नसल्यामुळे मुलाची पिग्गी बँक आणली.
- यावर पोलीस अधिकारी अवाक झाले आणि त्यांनी रिक्षा चालकाचा दंड स्वतःच्या पैशाने भरला.
- एवढेच नाही तर त्यांनी रिक्षाचालकाच्या मुलाला बोलावून त्याची पिग्गी बँक परत केली.
- आता लोक पोलीस अधिकारी अजय मालवीय यांचे खूप कौतुक करत आहेत.
- नागपूर पोलिसांनीही सोशल मीडियावर हे शेअर केले आहे.
रोहितची रिक्षा का झाली होती जप्त?
- रिक्षा चालकाने रिक्षा नो पार्किंगमध्ये उभी केली होती, त्यामुळे त्याला २०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
- तपासादरम्यान असे आढळून आले की रोहितच्या नावावर आधीच दोन हजार रुपयांचे चलान होते.
- त्यामुळे त्याची रिक्षा जप्त करण्यात आली.
- तो पाच, दहा रुपयांची नाणी आणि काही नोटा घेऊन चलान भरण्यासाठी आला होता.
- चलान भरण्याबरोबरच त्यांनी भविष्यात असे काही करणार नाही आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करेल असे वचन दिले.
- पण तो मुलाच्या पिग्गी बँकमधून दंड भरत असल्याचं कळताच पोलिसांमधील माणूस जागा झाला.